मोक्यातील आरोपीचा अप्पर पोलीस अधीक्षकांसमोर आत्महत्येचा प्रयत्न

जिल्ह्यात वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलेल्या आदेशानुसार तीन टोळ्यांमधील २७ जणांवर मोक्क्याची कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत अक्षय लालासाहेब पवार, निखील प्रकाश वाघमळे आणि अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव या टोळी प्रमुखांनाही अटक करण्यात आली होती.

    सातारा : मोक्क्यातील आरोपी निखील वाघमळे याने अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासमोर कपाळावर बेड्या मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यात वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलेल्या आदेशानुसार तीन टोळ्यांमधील २७ जणांवर मोक्क्याची कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत अक्षय लालासाहेब पवार, निखील प्रकाश वाघमळे आणि अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव या टोळी प्रमुखांनाही अटक करण्यात आली होती.

    त्यामधील निखील वाघमळे (वय २८, रा. आरळे) याला सातारा तालुका पोलीस ठाण्यातील शिपाई दिगंबर वाघोरे, पोलीस नाईक एच.एस.शिंदे हे चौकशीकामी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या केबीनमध्ये घेवून गेले होते. त्यावेळी वाघमळेच्या हातात बेड्या होत्या. त्याचाच फायदा घेत त्याने कपाळावर बेड्या जोरजोरात आपटत मला जगायचं नाही, असे म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.