कराडमध्ये अंगणवाडी सेविकांचा मोर्चा; निकृष्ट दर्जाचे मोबाईल शासनाला केले परत

    कराड : राज्य शासनाने पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. या मोबाईलची क्षमता कमी असल्यामुळे व ते निकृष्ट दर्जाचे असल्याने सतत हँग होतात. हे मोबाईल बदलून द्यावेत, अशी वारंवार मागणी करूनही शासन त्यांची दखल घेत नाही. म्हणूनच आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली कराड येथे अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून, निकृष्ट दर्जाचे मोबाईल फोन शासनाला परत केले. अंगणवाडी सेविकांच्या या मोर्चाला भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी सक्रिय पाठिंबा देत, या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

    शासकीय कामासाठी शासनाने दिलेल्या जुन्या मोबाईलची सध्याची परिस्थिती फार वाईट आहे. त्याची वॉरंटी संपली आहे. हे मोबाईल सतत हँग होतात, गरम होतात. तसेच बंद पडतात. त्याची क्षमताही कमी आहे. शिवाय शासनाने ‘पोषण ट्रॅकर’ दिले असून, ते इंग्रजी भाषेत असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शासनाने दिलेले मोबाईल बदलून द्यावेत, या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी अनेकदा आंदोलने केली. पण राज्य शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळेच आज अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून शासनाने दिलेले मोबाईल शासनाला परत केले.
    या आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्षा विमल चुनाडे, उज्वला जगताप, यशोदा पवार, उज्वला मोहिते, छाया पाटील, शबाना सुतार,विमल माने, मंगल जाधव, शशिका संकपळ, सुरेखा गायकवाड, निवासराव मोहिते यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

    बालकल्याण मंत्र्यांसोबत लवकरच बैठक

    मोर्चात सक्रीय भागिदारी करत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच या प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.