धक्कादायक ! आईनेच केला पोटच्या मुलांचा गळा दाबून खून

रुक्मिणीनगर (कराड) येथे आईनेच पोटाच्या दोन मुलांचा गळा दाबून खून केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तसेच आईने स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

    कराड : रुक्मिणीनगर (कराड) येथे आईनेच पोटाच्या दोन मुलांचा गळा दाबून खून केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तसेच आईने स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचे अपघाती निधन झाल्याने विरहातून आपण हे कृत्य केले असल्याची चिट्ठी तिने लिहिली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    हर्ष सुजित आवटे (वय 8) व आदर्श सुजित आवटे (वय 6) अशी आईनेच खून केलेल्या दोन मुलांची नावे आहेत. तर अनुष्का सुजित आवटे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आईचे नाव आहे.

    दरम्यान, मंगळवारी वारूंजी, ता. कराड येथे एका महिलेसह लहान मुलांचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच शहरातील वाखान परिसरात (रुक्मिणीनगर) आज स्वतःच्या दोन लहान मुलांचा गळा दाबून खून करून त्यांच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याने कराडसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, रुक्मिणीनगर परिसरात आवटे कुटुंबीय वास्तव्यास असून, त्यांचे तीन मजली घर आहे. घरात सर्वात वरच्या तिसऱ्या मजल्यावर अनुष्का आवटे या आपल्या दोन मुलांसह राहतात. तर मधल्या मजल्यावर अनुष्का यांचे दीर इतर कुटुंबियांसह राहत आहेत. अनुष्का आवटे यांचे पती सुजित आवटे यांचा सुमारे सहा महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अनुष्का यांना एकटे वाटत होते.

    तसेच त्यांच्या मुलांना वडिलांचे प्रेम मिळत नसल्याचे त्यांना वारंवार वाटत होते. त्यातूनच त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून स्वतःच्या दोन लहान हर्ष व आदर्श या मुलांसह स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनुष्का यांनी पहिल्यांदा त्यांची मुले हर्ष व आदर्श यांचा गळा दाबून खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसा उल्लेखही अनुष्का यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आहे.