विहिरीवरील मोटार चोरट्यांना दिला चोप, चोरटे म्हसवड पोलिसांच्या स्वाधीन

    म्हसवड : माण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारींची चोरी होण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, या चोरी सत्रामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत असतानाच शनिवारी (दि. २८) म्हसवड परिसरातील ढाकणी या गावामध्ये अशाचप्रकारे विद्युत मोटारी चोरणारी टोळीच ग्रामस्थांच्या हाती लागल्याने ग्रामस्थांनी या चोरट्यांना बेदम चोप देत म्हसवड पोलिसांच्या स्वाधीन केले.

    याबाबत म्हसवड पोलिसांनी अधिक माहिती दिली. त्यामध्ये म्हटले की, म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील ढाकणी या गावातील बाबा दादा खाडे यांचे ढाकणी गावातील काळेशेत नावाच्या शिवारात शेत असुन त्यामध्येच त्यांची विहीर आहे, त्या विहीरीवर त्यांनी ३ एच.पी. ची विद्युत पानबुडी मोटार बसवली असून त्याद्वारे ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्याचे काम करीत असतात. शनिवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कामे आटोपुन आपल्या घरी गेले त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर ढाकणी ग्रामस्थांनी फोन करुन सांगितले की, तुमच्या विहीरीवरील पानबुडी मोटार चोरण्यासाठी आलेल्या ४ जणांना आम्ही ताब्यात घेतले असून, तुम्ही लवकर या असा फोन आल्याने बाबा खाडे व त्यांची दोन मुले व शेजारी बारीकराव शिंदे असे सर्वजण त्याठिकाणी पोहचले. त्या ठिकाणी त्यांना आणखी गावातील १० ते १५ जण ओळखीचे दिसले.

    त्या सर्वांनी बाबा खाडे यांना सांगितले की, आमच्यापैकी काहीजण तुमच्या विहिरीकडून येत असताना दोन लोक विहिरीच्या कडेला उभे दिसले सदरचे ते लोक अनोळखी असल्याने त्यांच्याविषयी ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी फोन करुन गावातील इतरांना त्याठिकाणी बोलावुन घेतले व त्या सर्वांनी बाबा खाडे यांच्या विहिरीवर जाऊन पाहिले असता आणखी दोन इसम विहिरीमध्ये उतरुन पानबुडी सोडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले.

    ग्रामस्थांना पाहुन यापैकी वरील दोघांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पाठलाग करुन काही ग्रामस्थांनी पकडले तर विहीरीमध्ये असलेल्यांना विहीरीबाहेर बोलावले त्यांच्याकडे ग्रामस्थांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप देत म्हसवड पोलिसांच्या ताब्यात दिले. म्हसवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी विठ्ठल श्रीमंत बोडरे वय २५, आबा किसन सरगर वय २५, बाजीराव रामचंद्र चव्हाण वय ४०, व उमाजी विलास बुधावले वय २६ अशी नावे सांगितली असुन हे सर्वजण राहणार कन्हेर – इस्लामपुर ता. माळशिरस, जि. सोलापुर येथील आहेत. त्यांच्याकडून पोलीसांनी दोन मोटारसायकली, दोन करवती, एक विळा, दोरी असा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची बाबा दादा खाडे यांनी म्हसवड पोलीसात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या वरील चौघांची कसुन चौकशी सुरु आहे.