भरधाव मोटारसायकलची एसटीला धडक, तरूणाचा जागीच मृत्यू

कराड – कराड येथे भरधाव मोटारसायकलची एसटीला धडक बसल्याने मोठा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. काल गुरूवारी कराड तालुक्यातील येणपे येथील भागात ही घटना घडली. या अपघातात दुर्दैवीपणे २४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार, या मृत तरूणाचं नाव अविनाश सुतार असं आहे. कराड-येणपे एसटी बस काल गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास शेवाळेवाडी-येणपे या अरुंद वळणाच्या आणि चढ असलेल्या रस्त्यावर आली. त्याचवेळी कराडच्या दिशेने हा तरूण मोटारसायकलवरून वेगाने निघाला होता. परंतु एसटी समोरून येत असताना, या तरूणाने अचानक पाहिल्यामुळे त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटला.

भरधाव मोटारसायकलची एसटीच्या मागील बाजूस जोरात धडक बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी एसटी चालक जयसिंग पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील चौकशी पोलीस करत आहेत.