श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘साताऱ्यात भर पावसात झालेल्या सभेत पवारसाहेब मला बोल म्हणाले अन्…’

  खटाव : साताऱ्यात भर पावसात झालेल्या सभेत पवारसाहेब मला बोल म्हणाले आणि मी, मान साताऱ्याच्या गादीला पण मत राष्ट्रवादीला असे वक्तव्य केले. त्या सभेचा परिणाम सर्वांनीच पाहिला. मात्र, कोरेगावात शशिकांत शिंदेंचा निसटता पराभव झाल्याचे शल्य आजही मनाला टोचते. राष्ट्रवादीसारख्या प्रगल्भ विचारांच्या पक्षात इकडची बीडी, तिकडची काडी अन् कपभर चहा असे वागणारे कार्यकर्ते नसावेत. समाजाच्या हिताचे काम करताना शशिकांत शिंदे आणि प्रदीप विधातेंसारखी दूरदृष्टी ठेवून वाटचाल करावी. ही जोडगोळी आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी विचारांचा झंझावात निर्माण करेल, असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.

  खातगुण येथील सव्वातीन कोटींच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सारंग पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा नियोजनचे सदस्य सागर साळुंखे, बाळासाहेब इंगळे, माजी उपसभापती संतोष साळुंखे, आनंदराव भोंडवे, दगडूदादा शिंदे, राजेंद्र कचरे, जितेंद्र शिंदे, सुरेशशेठ जाधव, ज्ञानेश्वर जगताप, उदय कदम, तुकाराम यादव, रोहीत लावंड, सरपंच अमिना सय्यद, वसंतराव जाधव गुरुजी, उपसरपंच शिवाजी लावंड, जांब, गादेवाडी, दरुज येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, रामरहीम संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

  खासदार पाटील पुढे म्हणाले, आमदार शशिकांत शिंदे यांनी खटाव तालुक्यातील खातगुणसारख्या अनेक गावांमध्ये कोट्यवधींचा आणून शाश्वत विकास साधला आहे. ते जाणते आहेत. त्यांना मांडायला चांगले जमते. म्हणूनच त्यांची वरिष्ठ सभागृहात वर्णी लागली आहे. प्रदीप विधाते यांनीही या भागात विकासाचा दीप नेहमीच तेवत ठेवला आहे. या जोडगोळीने तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला भरघोस यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  शशिकांत शिंदे म्हणाले, गेल्या बारा वर्षात खातगुणसह खटाव, पुसेगाव गटात आम्ही अनेक विकासकामे केली. गेल्या दोन वर्षात मात्र या भागातील विकास ठप्प झाला आहे. विविध विभागांचे अधिकारी दहशतीखाली आहेत. भुलभुलैय्या जास्त काळ टिकत नाही. आमच्यापासून जे लांब गेलेत त्यांना आता सासुरवास भोगावा लागत आहे. जिहेकठापूरसाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. मंत्री असताना या योजनेला निधी देण्याबरोबरच वंचित गावांच्या समावेशासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही विघ्नसंतोषी विनाकारण चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करत आहेत.

  प्रदीप विधाते म्हणाले, राष्ट्रवादीच्या सर्वच वरिष्ठांनी नेहमीच या भागावर विशेष प्रेम केले आहे. शशिकांत शिंदेंनी तर गेल्या दहा वर्षात या भागाचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. त्यांच्या पराभवाने आमचे नुकसान झाले असले तरी आगामी सर्व निवडणूकांमध्ये आम्ही पक्षाची वाढलेली ताकद दाखवणार आहोत.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वसंतराव जाधव यांनी खातगुण ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठ्या मताधिक्याने मिळविलेल्या विजयाचा आणि विरोधकांच्या कोत्या मनोवृत्तीचा उहापोह केला. सूत्रसंचालन शंकरराव लावंड यांनी केले तर आभार दादा मुळे यांनी मानले.