वडूजमध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपंचायत मोर्चेबांधणी

  वडूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सत्तेचे समीकरण जुळवावी लागतात. त्याची प्रात्यक्षिका वडूज नगरीत पाहण्यास मिळाली आहे. आता होऊ घातलेल्या वडूज नगरपंचायत निवडणुकीत पक्षविरहीत स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातूनच नगरपंचायत निवडणुकीची मोर्चेबांधणीची चर्चा सुरू झाली आहे.

  महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रूपाने निधर्मी व जातीयवादी आणि पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते एकत्र आणले गेले. त्यातुन सत्तेचे लोणी वाटून खाण्यास भाग पाडले गेले आहे. मुळातच जातीयवादी? निधर्मी? पुरोगामी कोण? हे आता वेगळे करता येत नाहीत. तशी अवस्था गेली साडेचार वर्षात वडूज नगरपंचायत कारभाऱ्यांची झाली आहे. आता तर निवडणुका दिवाळीच्या तोंडावर आल्या आहेत. अशा वेळी ‘कोणाची सरशी कोण उभा राहणार राजकीय पारशी ‘कारण, वडूज नगरीचे सर्वच मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.

  वडूज नगरीतील राजकीय पक्षातील अनेक लोकनेत्यांनी खटाव तालुका केंद्रबिंदू मानून विकासाचा ध्यास घेतला होता. त्यामध्ये जयसिंगराव गोडसे, रावसाहेब काळे, दादासाहेब गोडसे यांच्या कार्याची दखल आजही घेतली जाते. आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली आहे. वडूज नगरपंचायत स्थापन झाल्यापासून ना जि. प.,  ना पं. स.सदस्य त्यामुळे जे काही राजकीय डावपेचांचा डाव खेळायचा असेल तो दीड किलोमीटरच्या वडूज नगरपंचायत परिघातच करावा लागणार आहे. हे सध्या तरी दिसत असले तरी काटेवाडीचा नेता पक्ष प्रमुख, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकतो मग, वडूजचा नेता खासदार-आमदार-मंत्री का होऊ शकतो नाही? असा ही युक्तिवाद केला जात आहे. त्यामध्ये तथ्य आहे. कारण, वडुजकरांची एकजूट झाली तर अनेक चमत्कार घडू शकतात, असा दावा केला जात आहे.

  सध्या वडूज नगरपंचायत मधील सतरा प्रभागातून सतरा नगरसेवक-नगरसेविका निवडून देण्यासाठी राजकीय पक्ष विरहीत स्थानिक विकास आघाडीच्या मोर्चाबांधणी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या, राष्ट्रवादी, काँग्रेस,शिवसेना घटक पक्षांकडून तर दुसऱ्या बाजूला भाजप, रासप रिपब्लिकन पक्ष व शिवसेना, मनसे सारखे पक्ष कोणता निर्णय घेतात. याकडे ही बरेच राजकारण व निवडणुका अवलंबून राहणार आहे. एकाच पक्षातील काही इच्छुक उमेदवार एकमेकांच्या समोर उभे राहिले तर चुरस अधिक गतिमान होणार आहे.

  वडूज नगरीत विकासाचा ध्यास असलेले अशोकराव गोडसे, विश्वासराव काळे, शहाजीराजे गोडसे, हिंदुराव गोडसे, डॉ. महेश गुरव, बाळासाहेब गोडसे, हणमंत खुडे, यांच्यासारख्या नेत्यांच्या शब्दाला मान आहे. ‘आपल्या धडावर आपलेच डोके’ असावे. अशी अनेकांची धारणा आहे. त्याप्रमाणे वडूजकरांनीच नगर पंचायत निवडणुकीचे नियोजन करावे. त्यासाठी पक्षाची भूमिका बाजूला ठेवून एकत्र यावे असा विचार पुढे येत आहे. वडूज नगरपंचायत हद्दी बाहेरचे नेते मंडळींनी या निवडणुकीत हस्तक्षेप करू नये, असाही सूर उमटत आहे. त्यातून स्थानिक पातळीवर आघाडी झाली तर विकास हाच महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.

  त्यासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यानी मन जोडण्याचा आता पासून प्रयत्न करावा, शक्य झाले तर बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केल्यास वडूजकरांचा दबाव कायम स्वरूपी राहील असे चित्र दिसत आहे. अर्थात हे कितपत शक्य होईल हे येणारा काळच ठरवेल.

  …तरच वडूजची खरी ताकद दिसेल

  वडूज नगरीच्या विकासासाठी सर्वांनीच सहकार्य केले तर वडूज नगरी प्रगती पथावर निश्चितच येईल. या ठिकाणी असलेल्या सुशिक्षित मतदारांनी सुध्दा सहभाग घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने वडूजची राजकीय ताकद दिसून येईल.

  – विश्वास जगताप, ज्येष्ठ मतदार, वडूज