नरेंद्र पाटील व उदयनराजे यांची महामार्गावर गळाभेट ; पाटलांच्या राजकीय वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

पाटील हे माेठमाेठ्याने हसत महाराज साहेब, साहेब आता मुख्यमंत्री होताहेत. काळजी नाही आता, असं म्हणाले. त्यावेळी उदयनराजेंनी पुन्हा पाटील यांना मिठी मारली. दरम्यान सेनेत असणा-या पाटील यांच्या वक्तव्याने परिसरात असलेल्यांना धक्काच बसला. पाटील यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण हाेणार आहेत की आहे अशी चर्चाही रंगू लागली आहे.

  सातारा : मराठा आरक्षणावर सातत्याने राज्य सरकारला धारेवर धरणा-या शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर येथे खासदार उदयनराजे भाेसले आणि शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील यांची भेट झाली. दाेन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारत खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद व्यक्त केला.

  लोकसभा निवडणूकीत शिवसेनेकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे खासदार उदयनराजे भाेसले यांच्या विराेधात उमेदवार हाेते. त्यावेळी खासदार भाेसले हे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये हाेते. त्यावेळी उदयनराजे भाेसले चांगल्या मताधिक्क्याने निवडून आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपुर्वी उदयनराजेंनी राष्ट्रवादीला साेडचिठ्ठी दिली. भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने उदयनराजेंनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत उदयनराजेंचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. तर राज्यात महाविकास आघाडी (राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, शिवसेना) हे सरकार आले.

  या सरकारला वेगवेळ्या मुद्द्यांवर वेळाेवेळी उदयनराजेंनी घेरण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उदयनराजेंनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आरक्षण मिळण्यासाठी सरकाराने प्रयत्न करावेत अशी मागणी केली. दूसरीकडे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनीही मराठा आरक्षणावर सरकारवर सातत्याने ताेफ डागली आहे. सध्या त्यांचे राज्यात सर्वत्र दाैरे सुरु आहेत.

  वाई येथील दाैरा संपवून नरेंद्र पाटील हे मुंबईला जात असताना खेड शिवापूरजवळ त्यांना खासदार उदयनराजेंची गाडी उभी असलेली दिसली. पाटील यांनी चालकास गाडी जवळ थांबण्याची सूचना केली. यावेळी पाटील हे गाडीतून उतरुन उदयनराजेंच्या दिशेने गेले. त्याचवेळी उदयनराजेंनी त्यांच्याकडे जात मिठी मारली.

  या भेटीत पाटील हे माेठमाेठ्याने हसत महाराज साहेब, साहेब आता मुख्यमंत्री होताहेत. काळजी नाही आता, असं म्हणाले. त्यावेळी उदयनराजेंनी पुन्हा पाटील यांना मिठी मारली. दरम्यान सेनेत असणा-या पाटील यांच्या वक्तव्याने परिसरात असलेल्यांना धक्काच बसला. पाटील यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण हाेणार आहेत की आहे अशी चर्चाही रंगू लागली आहे.

  या भेटीबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खूप दिवसांनी माझी महाराजांशी गाठभेट झाली. मराठा आरक्षणासाठी मी राज्यात दाैरे करीत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात फार अल्पवेळ असताे. आम्हा दाेघांना भेटल्यावर आनंद झाला. ताे आम्ही व्यक्त केला. आमच्या दाेघांत राजकीय विषयावर काेणतीच चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.