महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; दिला ‘हा’ इशारा

    सातारा : पेट्रोल, डिझेलसह इतर सर्वच वस्तुंच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, यापुढच्या काळात महागाईप्रश्नी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गावोगावी आंदोलन करुन सरकारला जेरीस आणतील, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

    महागाईप्रश्नी तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन दिल्यानंतर शिंदे बोलत होते. ते म्हणाले, पेट्रोल दरासह महागाई व काळ्या पैशांचे भांडवल करुन केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र, सहा वर्षांपेक्षा अधिक काळ सरकार चालवूनही त्यांना महागाईवर सक्षम उपाययोजना करता आली नाही. परदेशातील काळा पैसा परदेशातच राहिला. मात्र, गोरगरीबांच्या खिशालाच दिवसेंदिवस चाट बसत आहे. एकीकडे उद्योजकांचे खिशे भरायचे आणि दुसरीकडे पेट्रोल, खते, गॅस यांची सबसिडी कमी करुन सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचा उद्योग सरकारकडून सुरु आहे.

    सीबीआय, ईडीसारख्या संस्थेचा गैरवापर करुन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग सुरु आहेत. जरंडेश्वरसारखा साखर कारखाना चांगला चालला असताना त्याच्यावर ईडीचे अस्त्र उभारले आहे. या कारवाईने भविष्यात हजारो शेतकरी कामगारांच्या संसारात विष कालविले जाणार आहे. याबाबत सरकारने फेरविचार करावा, असेही शिंदे म्हणाले.