मांढरदेव येथे नवरात्रोत्सवास सुरवात; मंदिरे खुली झाल्याने भाविकांमध्ये आनंद

दरवर्षी मांढरदेव येथे नवरात्रोत्सवात नऊ दिवस भाविक मोठी गर्दी करतात. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेता येत नव्हते. मात्र, यावर्षी शासनाने नवरात्र उत्सवात मंदिर सुरू केल्याने भाविक आनंदित आहेत.

    वाई : महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या नवरात्रोत्सवास (Navratri 2021) आनंदी व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. कोविड १९ या रोगाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील मंदिरे गेली कित्येक महिने बंद होती. शासनाच्या निर्देशानुसार आज धार्मिकस्थळे खुली करण्यात आली.

    मांढरदेव देवस्थाने काळूबाई देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले केले आहे. घटस्थापना असल्याने उत्सवास प्रारंभ झाला. मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीची यथोचित पूजा करून पारंपारिक पध्दतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दरवर्षी मांढरदेव येथे नवरात्रोत्सवात नऊ दिवस भाविक मोठी गर्दी करतात. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेता येत नव्हते. मात्र, यावर्षी शासनाने नवरात्र उत्सवात मंदिर सुरू केल्याने भाविक आनंदित आहेत.

    देवस्थान ट्रस्ट मांढरदेव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी योग्य खबरदारी घेतली आहे. शासनाने घालून दिलेले निर्बंधाचे काटेकोर पालन करून भाविकांना दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. नवरात्र उत्सवादरम्यान काळूबाई देवीचे मंदिर पहाटे ४ ते रात्री १२ पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.

    दिवसभरामध्ये मंदिर व परिसर दोन तासाच्या फरकाने सॅनिटायझर केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी योग्य खबरदारी घेऊन देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.