जिल्हा बँकेच्या सत्ताकारणासाठी राष्ट्रवादीचा ‘मास्टरप्लॅन’; महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याला मिळणार नारळ

बॅंक सर्वसमावेशक बिनविरोध करताना ‘महाविकास’चा फॉर्म्युला बाजूला ठेवण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. राखीव मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

    सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असूनही केवळ मते जास्त असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घ्यावे लागत आहे. पण, सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत असल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील आमदार मकरंद पाटील यांच्यावरही या निवडणुकीची मदार असणार आहे. बॅंक सर्वसमावेशक बिनविरोध करताना ‘महाविकास’चा फॉर्म्युला बाजूला ठेवण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. राखीव मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. कारण यावेळेस खुद्द सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे रिंगणात असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच उमेदवार निश्चित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द अंतिम राहणार आहे. पण, यावेळेस राष्ट्रवादीच्या विरोधात दुसरे पॅनेल उभेच राहू नये, यासाठीची बांधणी सध्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होणार आहे. यावेळेस जिल्हा बॅंकेवर संचालक होण्यासाठी राष्ट्रवादीतून इच्छुकांची मांदियाळी आहे. या सर्वांना सामावून घेता येणार नाही. त्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. ज्या तालुक्यात पक्षाचा आमदार नाही, तेथील पदाधिकाऱ्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

    सध्यातरी नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा बॅंकेसाठी ठराव केले आहेत. कच्ची मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतरच निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत, हे समजणार आहे. सध्या तरी राष्ट्रवादीने आपल्या काही खेळ्यांबाबत गुप्तता पाळली आहे. तर सर्वसमावेशक पॅनेल उभे करताना राज्यातील सत्तेतील महाविकासाचा फॉर्म्युला बाजूला ठेवण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा दबाव वापरून जिल्हा बॅंकेत संचालकपद मिळविणे तितकेसे सोपे राहिलेले नाही.

    काही जुन्या संचालकांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबतही विचार झाला आहे. यामध्ये राखीव जागांवर बहुतांशी सर्वच उमेदवार नवखे असणार आहेत. यामध्ये काही इच्छुकांना ‘ॲडजेस्ट’ केले जाईल. त्यामुळे कोणताही वाद निर्माण न होता, जिल्हा बॅंकेची निवडणूक शांततेत कशी करता येईल, याबाबतची रणनीती पालकमंत्री बाळासाहेब पाटील व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे आखणार आहेत.

    जिल्हा बॅंकेच्या मतदारसंघनिहाय मतांची आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत आहेत. त्यामुळे येथील नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर तसेच सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर निवडणुकीची मदार अवलंबून आहे. ते ठरवतील त्यांनाच संचालक म्हणून बॅंकेत प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे या नेत्यांच्या गाठीभेटींवर इच्छुकांनी भर दिला आहे.