इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे साताऱ्यात धरणे आंदोलन

    सातारा : पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती व घरगुती गॅसची झालेली दरवाढ या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने साताऱ्यात धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली.

    राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व युवा मोर्चाचे तेजस शिंदे, राष्ट्रवादीचे सचिव राजकुमार पाटील यांच्यासह आंदोलकांनी वाढत्या महागाईच्या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधले. मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणला. काही आंदोलक थेट क्रिकेटपट्टूच्या वेषभूषेत या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव आंदोलक पोवई नाक्यावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले.

    जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना सुनील माने व तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महागाईच्या निषेधाचे निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद आहे की पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ यामुळे जनता महागाईने त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारचे भाववाढीचे गणित सर्वसामान्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे असून केंद्र शासनाविषयी प्रचंड असंतोष आहे. केंद्र शासनाचे गॅस दरवाढीवर सुध्दा कोणतेही नियंत्रण नाही. ही इंधन दरवाढ तत्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.