मी हातात घेतलेली कुठलीही कामे अपूर्ण ठेवली नाहीत : शिवेंद्रसिंहराजे भोसले

    केळघर / नारायण जाधव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोंडारवाडी धरण प्रकल्पास मदत करत असल्याने व बोंडारवाडी ग्रामस्थ यांनी काही मुद्यावर या प्रकल्पास सहमती दिल्याने हा प्रश्न निश्चितच लवकरात लवकर मार्गी लागेल, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

    सध्या तालुक्यात कण्हेर, महू, हातगेघर, धरणानंतर केळघर- केडंबे विभागात होऊ घातलेल्या बोंडारवाडी धरणावरुन विभागात काही लोकांकडून गटातटाचे राजकारणाला खतपाणी घातले जात आहे. धरणाची भिंत उभी राहण्यापूर्वीच त्याला उभा तडा जात आहे. तो तडा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जोडण्याची गरज आहे. या प्रकल्पाबाबत जनतेमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी व प्रकल्पाची माहिती देण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.

    या पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पुढील ५० वर्षांचा विचार करून मेढा, केळघर परिसरातील ५४ गांवाच्या पिण्याच्या पाण्याचा, तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा. यासाठीच बोंडारवाडी धरण प्रकल्प उभा राहत असून, यामध्ये कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. तालुक्याचा आमदार या नात्याने हा प्रकल्प पूर्ण व्हावा. यासाठी मी निश्चित पाठपुरावा करत आहे. बोंडारवाडी ग्रामस्थांनी काही मुद्यावर या प्रकल्पाला मान्यता दिल्याने या कामाला आता गती येईल. त्या ठिकाणी बंधारा नव्हे तर धरणच होणार असून, त्याबाबत कोणीही जनतेमध्ये गैरसमज पसरवू नयेत, असाही इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले आहे.

    बोंडारवाडी धरण कृती समितीचे विजयराव मोकाशी यांच्याबरोबर आम्ही होतो. चक्का जाम आंदोलनातही आम्ही सहभागी होतो. अजित पवार व संबंधित अधिकारी यांच्याशी अनेकवेळा बैठका व विचारविनिमय झाला आहे. मी हातात घेतलेली कुठलीही कामे अपूर्ण ठेवली नसून हा प्रकल्प पूर्णत्वास नेणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    ज्या क्षमतेची या धरणास मान्यता आहे त्या क्षमतेचेच हे धरण होईल. भिंतीला ग्रामस्थांचा विरोध होता. भिंत खाली झाली काय किंवा वर सरकवून झाली काय याला महत्व नसून धरण होणे महत्वाचे आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. मीच काय पण दुसऱ्या कोणीही हा प्रश्न मार्गी लावावा. पण धरण व्हावे हीच सर्वांची मानसीक इच्छा आहे. या प्रकल्पात २५ हेक्टर शेतजमीन जात असून त्या जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा, यासाठीही आपण पाठपुरावा करत असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.