राष्ट्रवादीच्या मेळाव्याशी आमचा संबंध नाही; कमल जाधव, अरविंद जाधव यांचे स्पष्टीकरण

    सातारा : काही ठेकेदारांनी भोंदवडे ता. सातारा येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला असल्याचे समजले. त्यासाठीच्या फलकांवर आमची नावे प्रसिध्द केली. मात्र, त्या ठेकेदारांनी आम्हाला विचारात न घेता, आम्हाला काहीही कल्पना न देता हा मेळावा घेतला आहे. काही ठेकेदारच जर सगळं काही ठरवणार असतील तर पक्षही त्यांनीच वाढवावा. आमचा या मेळाव्याशी काहीही संबंध नाही आणि मेळाव्यात आमचा कसलाही सहभाग नाही. त्यामुळे परळी भागातील जनतेने गैरसमज करुन घेऊ नये, असे जिल्हा परिषद सदस्या कमल जाधव, पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव आणि सदस्या विद्या देवरे यांनी स्पष्ट केले आहे.

    याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी भागातील आम्ही पदाधिकारी असून काही ठेकेदारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भोंदवडे येथे घेतला आहे. या मेळाव्यासाठीच्या फलक आणि पत्रकावर आमची नावे छापण्यात आली आहेत. मात्र, या मेळाव्याबाबत आम्हाला कोणीही कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. याबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा, विचारणा केली गेली नाही. फलक लावल्यानंतर आम्हाला मेळावा असल्याचे समजले. त्यामुळे या मेळाव्याशी आमचा काहीही संबंध नाही, याची नोंद परळी भागातील जनतेने घ्यावी.

    फलकावर आमची नावे असल्याने लोकांचा गैरसमज झाला आहे. वास्तविक या मेळाव्याशी आमचा काहीही संबंध नाही. काही ठेकेदार जर पक्षाच्या कार्यक्रमांशी संबंधीत निर्णय घेणार असतील तर, त्यांनीच पक्षवाढ आणि पुढचं सगळं बघावं, असे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या कमल जाधव, पंचायत समीती उपसभापती अरविंद जाधव, सदस्या विद्या देवरे यांनी म्हटले आहे.