ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा; कुस्तीप्रेमींची मागणी

स्व. खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. मात्र, त्यांचा अद्यापही देशाने यथोचित सन्मान केलेला नाही.

  कराड : स्व. खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. मात्र, त्यांचा अद्यापही देशाने यथोचित सन्मान केलेला नाही. ही त्यांची उपेक्षा असून सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजित जाधव यांच्यासह कुस्तीप्रेमींनी केली आहे.

  ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांना सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, या मागणीसाठी कार्वे नाका (कराड) येथील त्यांच्या स्मृतीस्तंभासह तहसीलदार कार्यालयासमोर रणजित जाधव यांच्यासह तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी उपोषण सुरु केले आहे. याप्रसंगी त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. यावेळी कुस्तीप्रेमींसह गोळेश्‍वर ग्रामस्थ उपस्थित होते.

  देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या ऑलिम्पिकवीराच्या कुटुंबियांसह कुस्तीप्रेमींना पै. खाशाबा जाधव यांच्या यथोचित सन्मानासाठी आंदोलन करावे लागत आहे. हे चित्र गेल्या काही काळापासून दिसून येत आहे. तरीही सरकारकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे याच मागणीसाठी पुन्हा कराड येथे त्यांच्या स्मृतीस्तंभासमोर त्यांचा मुलगा रणजित जाधव आणि तहसीलदार कार्यालयासमोर परिसरातील कुस्तीप्रेमींनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

  तसेच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, त्यांच्या नावाने होत असलेल्या राष्ट्रीय कुस्ती संकुलास निधी उपलब्ध व्हावा, त्यांना मरणोत्तर पद्म विभूषण मिळावा, खाशाबा जाधव यांच्या यांचे नाव वापरुन बोगस पुरस्कार देणाऱ्यांवर कारवाई करावी, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सदर मागण्यासंदर्भात शासनाने येत्या पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतीस्तंभासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांचा मुलगा रणजीत जाधव यांनी दिला आहे.

  त्याचबरोबर, येथील तहसीलदार कार्यालयासमोर एस. पी. वडाप फाउंडेशनच्या वतीने पै. अमोल साठे, सचिन पाटील यांनीही मौन उपोषण सुरू केले आहे. स्व. खाशाबा जाधव यांना भारतरत्न व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसह आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण चालू करावे, गोळेश्‍वर येथील क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा करून संकुलाची उभारणी करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

  मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार द्या

  पै. खाशाबा जाधव यांनी सुमारे 69 वर्षापूर्वी भारताला कुस्ती क्षेत्रात पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले होते. त्यानंतर ते हयात असेपर्यंत सुद्धा देशाने त्यांचा योग्य सन्मान केला नाही. त्यासाठी तमाम कुस्तीप्रेमींनी 37 वर्ष संघर्ष केला. त्यांच्या निधनानंतरही गेली ३२ वर्ष हा संघर्ष सुरूच असून, त्यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी त्यांचा मुलगा रणजीत जाधव यांनी केली आहे.