…तरच झाडांची गावं उदयास येतील; सयाजी शिंदे झाले भावूक

    वडूज : आजच्या परिस्थितीमध्ये सर्वत्र झाडाझुडूपांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली असून, सिमेंटची जंगलं दिसत आहेत. तसं पाहिलं तर शहरी भागात ही परिस्थिती जास्त प्रमाणात आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही झाडं लावण्यासाठी मुबलक प्रमाणात जमीन, माळरान आहे. प्रत्येक व्यक्तीला ऑक्सिजनची गरज आहे, वाढत्या प्रदूषणाने दूषित हवा, पाणी याचा दिवसेंदिवस अतिरेक वाढत आहे.

    रोगराई प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने ऑक्सिजन कमी पडू लागला आहे, अशा परिस्थितीत जर निरोगी जगायचं असेल तर ऑक्सिजन मुबलक प्रमाणात पाहिजे आणि त्यासाठी झाडं लावून त्यांचं संवर्धन केलं तरंच झाडाची गावं उदयास येतील आणि सारं काही सुजलाम, सुफलाम होईल, असं मत सुप्रसिद्ध अभिनेते व निसर्गमित्र सयाजी शिंदे यांनी सातारा येथे व्यक्त केले.

    लाखो लोकांचे फॅन असलेले सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, सह्याद्री गेवराईच्या माध्यमातून चळवळ उभी करून वृक्ष लागवडीचा ध्यास घेतलेले रुपेरी पडद्यावर नायक, खलनायक भूमिकेत दिसणारे परंतु प्रत्यक्षात झाडावर प्रचंड प्रेम असलेले समाजप्रबोधनकार सयाजी शिंदे यांची सरपंच परिषद पुणेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता सयाजी शिंदे यांनी त्यांचे वृक्ष लागवड व संवर्धनबाबत विचार आणि त्याचा भावी पिढीला होणारा फायदा कथन केला. प्रत्येक व्यक्तीच्या मनाला नक्कीच समाधान वाटेल. एवढे झाडाबद्दल असलेले प्रेम, आपुलकी आणि झाडापासून माणसाला मिळत असलेले फायदे सयाजी शिंदे यांनी आपल्या शब्दात विशद केले, हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळले.

    झाडांबद्दल असणारी त्यांची ही तळमळ पाहून सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रने सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत प्रत्येक तालुक्यातील सरपंच, वृक्षप्रेमी यांना एकत्र करून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’ या ब्रीदवाक्याला साजेसे काम प्रत्येक गावात करायचे, असा निश्चय प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले आदी पदाधिकऱ्यांनी यावेळी केला.