सातारा पालिकेच्या अठरा महिन्यात केवळ तीन सर्वसाधारण सभा

  सातारा : सत्तारूढ सातारा विकास आघाडीच्या पंचवार्षिक कारभारात सर्वात कमी सर्वसाधारण सभा घेण्याचा नकोसा विक्रम नोंदवला जाणार आहे. मोठ्या विकासकामांचा डांगोरा पिटणाऱ्या सातारा पालिकेने गेल्या अठरा महिन्यात सातारकरांच्या विकासकामांना मंजूरी देणाऱ्या केवळ तीन सर्वसाधारण सभा घेतल्याने पायाभूत विकास कामांवर प्रचंड मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचे सरधोपट कारण देत सत्ताधारी मात्र जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न करित आहेत.

  सातारा पालिकेच्या आगामी निवडणुका केवळ चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या असताना साताऱ्यात विविध पक्षाची राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सातारा विकास आघाडीचे प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटर, कास धरण उंची, पालिकेची नवीन इमारत, भुयारी गटार योजनेच्या निमित्ताने वचननाम्यातील 90 टक्के कामे झाल्याचा दावा केला. मात्र ग्रेड सेपरेटर वगळता अन्य विकास कामांचे पूर्णत्व दृष्टीक्षेपात नसल्याने प्रत्यक्षात सातारकरांना त्या सुविधा मिळालेल्या नाहीत .

  सर्वसाधारण फंडातील कामांसह नगरोत्थान व वैशिष्टयपूर्ण योजनेच्या प्रस्तावांना मंजूरी देणाऱ्या फक्त तीन सर्वसाधारण सभा सातारा पालिकेने गेल्या अठरा महिन्यात घेतल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे. नगरपालिका अधिनियम 1965 (81) प्रमाणे महिन्यातून एक याप्रमाणे वर्षातून बारा सभा होणे अपेक्षित आहे. मात्र जानेवारी 20 ते जुलै 21 या अठरा महिन्यात झालेल्या दहा सभांपैकी केवळ तीनच सभा या सर्वसाधारण होत्या. यामध्ये चार विशेष सभा या स्वीकृत नगरसेवक सभापती व उपनगराध्यक्ष निवडीच्या व एक विशेष सभा ही पालिकेच्या बजेट मंजूरीची होती.

  मार्च 2020 पासून जिल्ह्यात करोनाचे वाढलेले संक्रमण यामुळे नगरविकास विभागाने ऑनलाईन सभांचा फतवा काढला. तत्पूर्वी 13 फेब्रुवारी 2020 रोजी शेवटची ऑफलाईन सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर आजअखेर सातारा पालिकेने ऑनलाईनच्या नियमावर बोट ठेवत शेवटची ऑनलाईन सर्वसाधारण सभा 3 फेब्रुवारी 2021 रोजी घेतली होती. कोरोनाचे निमित्त देऊन तब्बल एक वर्ष सर्वसाधारण सभांना फाटा देण्यात आला. 8 एप्रिल 2021 ची सर्वसाधारण सभा कोरोनाचे कारण देऊन रद्द करण्यात आली.

  राजकीय वाद जातोय टोकाला

  सर्वसाधारण सभा ऑनलाईन असल्या तरी त्याच्या अनियमिततेमागे सत्ताधारी गटात माजलेली दुफळी, सोयीच्या प्रस्तावासाठी दबावाचे राजकारण , सूचक व अनुमोदकांशिवाय अपुऱ्या टिपण्यांचे घेणारे प्रस्ताव, वादातील प्रकल्पांना विरोध होण्याची भीती, नगराध्यक्ष फंडावरून वारंवार व्यक्त होणारी नाराजी, टेंडर प्रक्रियांच्या टक्केवारीचा वाद या विविध कारणांमुळे राजकीय वाद टोकाला जाऊन सर्वसाधारण सभा सातत्याने लांबणीवर पडल्याची उदाहरणे आहेत . त्यात गेल्या पंधरा महिन्यात करोनाचे संक्रमण हटत नसल्याने सातारा जिल्ह्याची अ वर्ग नगर पालिका या नात्याने अंत्यसंस्कार व कंटेन्मेंट झोन या विविध कामांसाठी पालिकेचे तब्बल 89 रूपये खर्च झाले. त्यामुळे जलतरण तलाव अद्ययावतीकरण, शहरातील मंडईचे प्रशस्तीकरण , रस्ता रुंदीकरण व पॅचिंग, पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे फेरलिलाव, खुल्या जागांच्या भाडयांची निश्चिती या विविध कामांवर निश्चित मंजुरीच्या धोरणा अभावी मर्यादा आल्या आहेत.

  4 जानेवारी 2020- विशेष सभा

  13 फेब्रुवारी2020- सर्वसाधारण सभा

  20 फेब्रुवारी -2020- बजेट सभा

  21 ऑक्टोबर -2020- स्वीकृत नगरसेवक निवड ( विशेष सभा )

  5 नोव्हें 2020- उपनगराध्यक्ष निवड ( विशेष सभा )

  29 डिसेंबर2020- स्वीकृत . निवड विशेष सभा

  11जाने-2021- सभापती निवड विशेष सभा

  3 फेबुवारी 2021- सर्वसाधारण सभा –

  26 फेब्रुवारी 2021- बजेट विशेष सभा

  8 एप्रिल 2021- सर्वसाधारण सभा -तहकूब – मुख्याधिकाऱ्यांकडून विशेष मंजूरी