संघटन समाजाच्या भल्यासाठी असावे : माणिककाका शेडगे

  भुईंज : कोणतेही संघटन जेव्हा समाजाच्या भल्यासाठी कारणीभूत ठरते त्यावेळी त्याचा उद्देश सफल ठरतो. अशाच संघटन कार्यातून आरोग्य जागृती करण्याचे काम सायकल रॅलीसारख्या उपक्रमातून नक्की होईल, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवा समूहाचे संस्थापक माणिक काका शेडगे यांनी अंगापूर वंदन, ता. सातारा येथे व्यक्त केला.

  भुईंज, ता. वाई येथील सम्राट मंडळाच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भुईंज अंगापूर वंदन भुईंज सायकल रॅलीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी सामाजिक कार्याची तळमळ असलेल्या युवकांकडूनच भक्कम व मजबूत देशकार्य घडेल, त्यासाठी युवकांनी एकजूट, सुसंस्कार व मेहनत या गोष्टीला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

  यावेळी माणिककाका शेडगे यांच्या हस्ते सहभागी सायकल स्वारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
  सर्व सायकलस्वारांची चहा, नाश्ताची सोय करून लोकसेवा परिवाराने आदरातिथ्य केले. त्यांच्या या आपुलकीने सर्वजण भारावून गेले.

  यावेळी माणिककाका शेडगे, लहू कणसे, भाग्यवान घाडगे, सुरेश ढोणे, माधुरी कारंडे, गणेश देवस्थानचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, सम्राट मंडळ, सायकल वेडे ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. भुईंज येथून पहाटे ५.३० वाजता सुरू झालेल्या या रॅलीने १०० किमीचे अंतर पार करून यशस्वीपणे भुईंजमध्ये पुन्हा दाखल झाली.

  या रॅलीत भुईंज, वाई, सातारा, कोरेगाव व उंब्रज येथील सायकलपटू सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी सायकल वेडे ग्रुप, मयूर जाधव, साक्षी एरिगेटर्सचे दिलीप भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले. हर्ष सुनील शेवते, साई संजय शेंडे व अजिंक्य संजय पिसाळ या चिमूरड्यांचा या रॅलीतील सहभाग लक्षणीय ठरला. उपक्रमाबद्दल सम्राटच्या कार्यकर्त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.