सीईओ साहेबांना म्हसवडचे वावडे आहे का?

  म्हसवड/महेश कांबळे : सध्या सातारा जिल्ह्यामध्ये १८ ते ४४ या वयातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनातर्फे राबवला जात आहे. ती लस जिल्ह्यात कोठे-कोठे द्यावी, याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले असले तरी त्यांच्या या आदेशामध्ये माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर अशी ओळख असलेल्या म्हसवड शहराचा नामोल्लेख नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सीईओ साहेबांना म्हसवडचे वावडे आहे का? असा उद्विग्न सवाल म्हसवडसह परिसरातील नागरिकांतून विचारला जात आहे.

  सातारा जिल्ह्यातील सर्वात जुनी व सर्वात जास्त ८८.१९ चौ.कि.मी.क्षेत्रफळ असलेली नगरपरिषद म्हणून म्हसवडची वेगळी ओळख असून, या शहराची लोकसंख्याही सुमारे ३२ हजारांहून अधिक अशी तालुक्यात सर्वाधिक आहे. तर माण तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण ही याच शहरात आजवर सापडले आहेत. त्यामुळेच या शहरात २ कोरोना सेंटर आहेत. या सेंटरमध्ये म्हसवडसह परिसरातील लहान-मोठ्या गावांतील शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. तर हजारो जण कोरोनामुक्तही झाले आहेत.

  कोरोनाला हरवायचे असेल तर शासन नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. तितकेच गरजेचे नागरिकांचे लसीकरण होणे आहे. यासाठीच शासनाने लसीकरणाची मोहिम अधिक तीव्र केली आहे. मात्र, त्या लसीचे नियोजन करण्यात प्रशासन कमी पडत आहे. म्हसवडसारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात ५० ते ६० लस उपलब्ध होत असल्याने येथे लसीकरणाचा वेग मंदावला आहे, अशी परिस्थिती असताना आता शासनाने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. त्याचा अध्यादेशही सीईओ गौडा यांनी काढला. त्यांच्या आदेशानुसार माण तालुक्यात दहिवडी येथेच या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे.

  माण तालुक्याचा विचार केल्यास दहिवडी या एकाच ठिकाण लसीकरण होणार असल्याने तेथील आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण तर येणारच आहे. याशिवाय संपूर्ण तालुक्यातील १८ ते ४३ वयोगटातील व्यक्तींची संख्या ही खूप मोठी आहे. दहिवडीबरोबरच म्हसवड येथेही ही सुविधा सुरु झाल्यास लसीकरणाचा वेग निश्चित वाढणार तर आहेच याशिवाय नागरिकांचा वेळ व पैसा ही वाचणार आहे. शासनाची ही लस जरी मोफत असली तरी ती घेण्यासाठी दहिवडीपर्यंतचा प्रवास या प्रत्येकालाच करावा लागणार आहे. तर दहिवडीपासून काही गावे ही जवळपास ६० किमी अतंरावर आहेत.

  या ठिकाणाहून लसीकरणासाठी जाणे प्रत्येकालाच शक्य होणार नाही. अन् गेल्यास एकाच हेलपाट्यात लस मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे नागरिकांतून लसीकरणाला प्रतिसाद कितपत मिळेल, हे सांगता येत नाही. याचा संपूर्ण विचार करुन जिल्हा प्रशासनाने म्हसवड शहरातही १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु करण्याचा नवा आदेश काढून नागरिकांना दिलासा द्यावा व शासनाच्या जलद लसीकरणास हातभार लावावा. तरच कोरोनाला हद्दपार करण्याचे शासनाचे व जनतेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

  म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६ आरोग्य उपकेंद्रे असून, म्हसवड शहरात या वयोगटाचे लसीकरण सुरु झाल्यास म्हसवड शहरासह या उपकेंद्रातील व पुळकोटी, पळशी या आरोग्य केंद्रातील व्यक्तींना याचा लाभ लवकर मिळू शकतो.