फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी १०० वर्ष जुना राजवाडा कोविड रुग्णांसाठी दिला

सातारा : जिल्ह्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहून फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर घराण्याने लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला पत्र लिहून त्यांच्या २ वास्तू कोविड रुग्णांसाठी वापरण्याची तयारी दर्शवली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रामराजे यांच्या मालकीचा १०० वर्ष जुना राजवाडा विक्रम पॅलेस आहे. कोविड सेंटरसाठी हा राजवाडा देण्याची तयारी नाईक-निंबाळकर कुटुंबाने दाखवली आहे.

या संदर्भात रामराजेंनी सातारा जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं आहे की, आमचे सोनगाव येथील विक्रम पॅलेस आणि फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाडा हा कोविड रुग्णांच्या सेवेसाठी देण्याची तयारी आहे. विक्रम पॅलेस हा नाईक निंबाळकर यांच्या नातेवाईकांचा आहे. या पॅलेसमध्ये अनेक छोट्या रुम्स आहेत. त्यामुळे याठिकाणी कोविड सेंटर उभारलं जाऊ शकतं. ग्रामीण भागात वाढणाऱ्या कोरोना बाधितांमुळे रामराजेंनी हा निर्णय घेतला आहे.

फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांचा विक्रम पॅलेस देण्याबाबतचे पत्र प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना दिले आहे. रघुनाथराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत. या पत्रात लिहिल्याप्रमाणे पॅलेसमधील खालचा मजला हा महिलांसाठी तर वरील मजल्यावर पुरुष रुग्णांची व्यवस्था करता येईल. त्यासोबत आणखी गरज भासली तर फलटणचा मुधोजी मनमोहन राजवाडाही देण्याची तयारी आहे.

 

कोरोना संकटकाळात नाईक-निंबाळकर घराण्याने फलटण आणि आसपास केलेल्या मदतीचं कौतुकही अनेक जण करत आहेत. त्यात राजवाडा देण्याच्या निर्णयामुळे अनेकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. रघुनाथराजे निंबाळकरांनी लॉकडाऊनमध्ये फिरता दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी आणि औषधांची सोय गावोगावी केली होती. तर शहरात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.