खंडाळा येथे देशी वृक्ष लागवड

  खंडाळा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगरपंचायत खंडाळा, महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्र व हरेश्वर संवर्धन ग्रुप, जनसेवा मंच, ग्रामस्वराज्य युवा सामाजिक सेवा संस्था खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती व कै. रमेश रमण स्मृतीप्रित्यर्थ महाएनजीओ फेडरेशन प्रायोजित राज्यस्तरीय वृक्ष लागवड व संवर्धन अंतर्गत 200 देशी झाडांचे वृक्षारोपण अणि संगोपन उपक्रम खंडाळा येथील गायरान क्षेत्र खड्डीमशीन रस्ता येथे संपन्न झाला.

  यामध्ये देशी ऑक्सिजन देणारी आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र वनौषधी वड, पिंपळ, पिंपरन, उंबर, सिताफळ, पेरु, चिंच, बदाम, आवळा, जांभूळ, बोर, चाफा, बेल, कडुलिंब, आंबा, करंज अशा विविध झाडांचा समावेश आहे.

  वृक्षारोपणाचा शुभारंभ खंडाळा शहरातील ह.भ.प.आप्पासाहेब गाढवे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. हरेश्वर संवर्धन तरुण मंडळाच्या माध्यमातून आगामी काळात दोन हजार देशी झाडे लावून तीन वर्ष जोपासना करित हरेश्वर वनराई स्मृती उद्यान साकारले जाणार आहे. वृक्षारोपण मोहीममध्ये खंडाळा तालुक्यातील आध्यात्मिक व सामाजिक संस्था सहभागी होत्या.

  वारकरी संप्रदाय, धन निरंकर मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, समर्थ बैठक, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, गुरुकुल विद्यामंदिर, कोलंबस हेल्थकेअर, पुणे रेस्क्यूटिम आदी सहभागी झाले होते.

  दरम्यान, दत्तात्रय गाढवे, यशवंत गुरव यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक नरेश केसकर, मुकेश पटेल, कोलंबस हेल्थकेअरचे शिरीष गाढवे, हरेश्वर संवर्धनचे तानाजी गाढवे, गणेश गाढवे, आनंद गुळूमकर, सोमनाथ ननावरे, स्वरा गाढवे, सुप्रिया ननावरे, गौरी ननावरे यांनी परिश्रम घेतले.

  प्रारंभी प्रास्ताविक संदीप ननावरे यांनी केले. तर सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी करून मयुर शिर्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.