तलवारीने केक कापणारा गुंड पोलिसांच्या ताब्यात; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    सातारा : गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या चंदननगर कोडोली येथील गुंडाला सातारा शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली. यासोबत दहा ते बारा जणांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणी गायब झालेल्या इतर काही जणांचा शोध घेण्यात येत आहे.

    साताऱ्यातील गुंड वैभव जाधव याने गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी सार्वत्रिक करताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. अवघ्या काही तासातच गुंड वैभव जाधवच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

    साताऱ्यातील चंदननगर येथील गुंड वैभव चंद्रकांत जाधव ( वय 31, रा. चंदननगर) याने मध्यरात्री मित्रांसोबत गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता. यावेळी त्याने कोरोना नियमांचे उल्लंघन तसेच अवैधरित्या शस्त्र बाळगल्याच्या बातम्या सोशल मीडियात झळकल्यावर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा शहर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत बदे व त्यांच्या टीमने जितेंद्र गणपत चव्हाण, गणेश कांबळे, अनिकेत ननावरे, राहुल झणझणे व इतर सहा जणांना तत्काळ ताब्यात घेतले. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन व अवैधरित्या शस्त्र बाळगणे यांसारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कारवाईच्या भीतीने गायब झालेल्यांचा सुध्दा पोलिसांकडून करून शोध सुरू आहे.