साताऱ्यातील ‘रो-हाऊस’वर पोलिसांचा छापा; अंमली पदार्थांसह परदेशी नागरिकांना अटक

यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नंदनवन सोसायटीतील 'विष्णू श्री स्मृती' या बंगल्यात परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आपल्या सहकार्‍यांसह जावून या घराची तपासणी केली असता, घरामध्ये व घराच्या गच्चीवर अमली पदार्थांची लागवड केल्याचे आढळून आले, तसेच घरात बाटल्यांमध्ये भरून अमली पदार्थांचा मोठा साठा केल्याचेही निदर्शनास आले.

    सातारा: वाई येथील नंदनवन सोसायटीतील एका रो-हाऊसवर पोलिसांनी अचानक छापा टाकला होता. यावेळी बंगल्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची लागवड व साठा केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नंदनवन सोसायटीतील ‘विष्णू श्री स्मृती’ या बंगल्यात परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आपल्या सहकार्‍यांसह जावून या घराची तपासणी केली असता, घरामध्ये व घराच्या गच्चीवर अमली पदार्थांची लागवड केल्याचे आढळून आले, तसेच घरात बाटल्यांमध्ये भरून अमली पदार्थांचा मोठा साठा केल्याचेही निदर्शनास आले.

    आज सकाळी पुण्याहून फॉरेन्सिक लॅबच्या लोकांना याकामी अधिक माहितीसाठी वाई येथे पाचारण करण्यात आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर पंचनामा करून अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. सोमवारी रात्रीपासून सातारा पोलिस या प्रकरणाची माहिती घेत आहेत. घरमालकाच्या चौकशी बरोबरच परदेशी नागरिकांच्या सहकाऱ्यांचा शोध पोलिस घेत आहेत.