साताऱ्यात लॉकडाऊनच्या निर्णयावर राजकीय टोलेबाजी ; लोकप्रतिनिधींचे समर्थन आणि विरोधही

कधीही लॉकडाऊन करायला बापाची इस्टेट आहे का ? एक तर लसीचा पुरवठा योग्य नाही आणि वर पैशांचा सुध्दा अपहार . सचिन वाझे प्रकरणात कोणाला किती पोहोच झाले हे लोकांना समजायला हवे . वझेकडे असणारे सगळे पैसे घ्या आणि लस विकत घ्या . राजेशाही असती तर सगळ्यांना हत्तीच्या पायी तुडवले असते .

    सातारा : सातारा जिल्ह्यात लागू झालेला वीकएंड लॉकडाऊन, करोनाचे वाढते संक्रमण आणि आरोग्य सेवांचा तुटवडा या मुद्यांवर लॉक डाऊनच्या बाजूने आणि विरोधात जोरदार राजकीय टोलेबाजी झाली . खासदार उदयनराजे भोसले यांच्या भीक मागो आंदोलनाच्या निमित्ताने या चर्चांना जास्तच हवा मिळाली .

    “कधीही लॉकडाऊन करायला बापाची इस्टेट आहे का ? एक तर लसीचा पुरवठा योग्य नाही आणि वर पैशांचा सुध्दा अपहार . सचिन वाझे प्रकरणात कोणाला किती पोहोच झाले हे लोकांना समजायला हवे . वझेकडे असणारे सगळे पैसे घ्या आणि लस विकत घ्या . राजेशाही असती तर सगळ्यांना हत्तीच्या पायी तुडवले असते .”

    -खासदार उदयनराजे भोसले

    “करोना संक्रमणाची महामारी रोखणे हे महत्वाचे आहे . त्यासाठी राज्य सरकारचा निर्णय एका दृष्टीने योग्य आहे . मात्र दुसरीकडे व्यापारी वर्गाच्या आर्थिक कोंडीचाही विचार व्हावा . आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व योग्य नियोजन गरजेचे आहे .करोना व्हायरस बाबत कोणीही चुकीची विधाने करून नये . करोना महामारीचा वेग जेव्हा कमी होता तेव्हाच सरकारने योग्य उपाययोजनांसह सज्ज रहायला हवे होते .”

    -आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

    “करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा उदयनराजे यांनी नक्कीच विचार करायला हवा . करोनाची महामारी नियंत्रणात आणण्यासाठीच राज्य सरकारने विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे . अशा संवेदनशील परिस्थितीत खासदारांनी रस्त्यावर उतरणे योग्य नाही . लॉक डाऊनच्या पहिल्या दिवशी कोठेही काही अनुचित प्रकार घडला नाही .”

    -गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

    “कोरोनाचे वाढते संक्रमण आणि रुग्णांची वाढती संख्या यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत . राज्य सरकार जे निर्णय घेते ते केंद्र सरकारशी चर्चा करून घेते . खासदार उदयनराजे यांनी रस्त्यावर उतरण्याची जी भूमिका घेतली ती कदाचित केंद्राकडून राज्याला जास्त लस पुरवठा व्हावा यासाठीच असेल . लॉक डाऊनमध्ये व्यापारी वर्गही अडचणीत आहे .करोनाच्या महामारीत ही राजकारणाची वेळ नाही तर माणुसकीने सहकार्याने पुढे येण्याची वेळ आहे .”

    -आमदार शशिकांत शिंदे