उदयनराजे म्हणाले नमस्कार ! रामराजे म्हणाले बसा!

झालं असं. रामराजे नाईक निंबाळकर हे जिल्हा शासकीय निवासस्थान म्हणजेच सर्कीट हाऊसमध्ये बसलेले होते. अचानक उदयनराजे भोसले तिथं पोहोचले. रामराजे ज्या ठिकाणी बसले होते, तिथं पोहोचले आणि रामराजेंना हात जोडून नमस्कार केला. मग रामराजेंनीही त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि बसण्याची विनंती केली.

साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर या दोन नेत्यांमधला वाद महाराष्ट्राला चांगलाच परिचित आहे. हा वाद अनेकदा टोकाला गेल्याचं चित्र दिसतं. गेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान हा वाद अधिकच विकोपाला गेल्याचं चित्र दिसलं. लोकसभा निवडणुकीच्या काळात उदयनराजेंनी फलटणमध्ये जाऊन रामराजेंच्या घरी जाऊन घातलेला धिंगाणाही चांगलाच गाजला होता. पोलीस ठाण्यातही याची नोंद झाली होती. या दोन घराण्यांमधील राजकीय संघर्षाची केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चा होती. पण ही चर्चा आता वेगळं वळण घेताना दिसतेय.

उदयनराजेंची नाट्यमय एन्ट्री

हा संघर्ष संपला असं वाटायला एक घटना कारणीभूत आहे. झालं असं. रामराजे नाईक निंबाळकर हे जिल्हा शासकीय निवासस्थान म्हणजेच सर्कीट हाऊसमध्ये बसलेले होते. अचानक उदयनराजे भोसले तिथं पोहोचले. रामराजे ज्या ठिकाणी बसले होते, तिथं पोहोचले आणि रामराजेंना हात जोडून नमस्कार केला. मग रामराजेंनीही त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि बसण्याची विनंती केली. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे हे दोन नेते एकमेकांसमोर बसल्याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचाही काही काळ गोंधळ उडाला. राजकीय वर्तुळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जिकडं तिकडं एकच चर्चा सुरू झाली. जे दोन राजे एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते, ते एकमेकांसमोर बसून गप्पा मारताना पाहून अनेकांचा विश्वासच बसेना. दोघांनी एकमेकांशी नेमक्या काय गप्पा मारल्या, याचा तपशील समजले नाहीत. मात्र अशा प्रकारे दोघांनी भेटणं, एकमेकांना अभिवादन करणं आणि समोरासमोर बसून गप्पा मारणं हा दोघांमधील संघर्ष मिटल्याचं चिन्ह मानलं जातंय.

काळजी घ्या राजे !

सध्याच्या कोरोना संकटाबाबत दोघं काहीतरी बोलत होते, असं सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून कळतंय. रामराजे यांनी वयोमानानुसार कोरानापासून स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्ला उदयनराजेंनी जाता जाता रामराजेंना दिला, असंही तिथं उपस्थित काहीजणांनी सांगितलं. आता हे मनोमिलन होण्याचं नेमकं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.