स्ट्रीट लाईटसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा

    सातारा : वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाई भाजपच्या वतीने महावितरण कंपनीचे स्ट्रीट लाईटचे थकीत बिल ग्रामपंचायतीकडून न घेता शासनाकडून घेण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले. हे निवेदन वाई भाजपच्या वतीने व विविध ग्रामपंचायतीच्या वतीने सातारा जिल्हा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे देण्यात आले. त्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

    यावेळी वाई मतदारसंघांचे युवा नेते यशराज भोसले, सागर भाई जाधव, तेजस जमदाडे, विक्रम शिंदे, मयूर गाढवे, अथर्व पाटील व इतर उपस्थित होते. १५ व्या वित्त आयोगाच्या पैशातून गावातील आरोग्य, पाणी पुरवठा, गटारे आदी कामांसाठी खर्च करते. आता त्यातून स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यासाठी तरतूद ग्रामपंचायतीने करावी असे सांगण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना खीळ बसणार आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने फेरविचार करावा आणि ती स्वतः किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत भरण्यात यावी. जर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर याचा त्रास सामान्य जनतेला होऊ शकतो.