गोंदवले बुद्रुकमधील मुस्लिम समाजाने सुरू ठेवलेला रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य : राजकुमार भुजबळ

    म्हसवड : बकरी ईदच्या निमित्ताने दरवर्षी गोंदवले बुद्रुकमधील मुस्लिम समाजाने सुरू ठेवलेला रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य असून, या माध्यमातून सामाईक सलोखा राखण्यास मोठी चालना मिळत असल्याचे मत दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी व्यक्त केले.

    बकरी ईदच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. यावेळी राजकुमार भुजबळ, पंचायत समितीचे उपसभापती तानाजीराव कट्टे, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने आदी मान्यवरांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष डॉ. समीर तांबोळी, ज्येष्ठ सदस्य शेखहमीद तांबोळी, डॉ. समीना तांबोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य हाफीजा तांबोळी, मायणी मेडिकल कॉलेज रक्तपेढीचे डॉ. रायबोले व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या शिबिरात 27 जणांनी रक्तदान केले.

    राजकुमार भुजबळ म्हणाले, मुस्लिम समाज हा सर्वत्र मागासलेला व परंपरेला जखडून राहिलेला दिसतो. परंतु गोंदवल्यात मात्र आधुनिक विचारधारा घेऊन समाजोन्नती करत असलेला समाज आहे. या विचारधारेची सर्वानी प्रेरणा घ्यावी.

    उपसरपंच संजय माने म्हणाले, गोंदवल्यातील मुस्लिम समाजाचा जाती पातीला छेद देत गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात हिरीरीने सहभाग राहिला आहे. ईदनिमित्त रक्तदान उपक्रमातून रक्ताचे नाते जोडले जात असल्याने हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवावा. त्यासाठी आम्ही सर्वस्वी सहकार्य करू.

    शेखहमीद तांबोळी म्हणाले, येथील मुस्लिम समाज नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असून, समाजातील युवकांनी हा वारसा अखंडितपणे सुरू ठेवावा. यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अमृत पाटील, पोलीस पाटील आशा भोसले, ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील, तानाजी शिंगाडे, गुरुदत्त कुलकर्णी, प्रवीण कट्टे, अनिता रणपिसे, संदीप फडतरे, अश्पाक तांबोळी, जावेद तांबोळी, असीम तांबोळी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफशन तांबोळी हिने केले. सोहेल तांबोळी याने प्रास्ताविक केले तर सलोनी तांबोळी हिने आभार मानले.