सातारा पालिकेकडून तब्बल ७१ लाखाची मालमत्ता करमाफी ; ६६९७ बिगर निवासी मिळकतींना होणारा फायदा

गेल्या चौदा महिन्यापासून सुरू असलेल्या करोना महामारीने छोटे मोठे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत . त्यांची अडचण लक्षात घेऊन निवासी व बिगर निवासी मिळकत धारकांच्या घरपट्टी माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे . त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे .

    सातारा : सातारा पालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ६६९७ बिगर निवासी मिळकतीना तीन महिन्याची मालमत्ता कर माफी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे . या द्वारे ७१ लाख ५७ हजार १३ रुपयांची सूट दिली जाणार आहे याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे .

    पत्रकात नमूद आहे की ३ फेबुवारी २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रं ४१ नुसार सातारा शहरातील ६६९७ मिळकतींना तीन महिन्याच्या मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय झाला होता . ती ७१ लाख ५७ हजार १३ रूपयांची रक्कम सूट म्हणून बिलातून वगळली जाणार आहे . तीन महिन्याच्या मिळकत कराला देऊन करोनाच्या काळात साताऱ्याच्या व्यावसायिक बांधवाना दिलासा देण्याचा हा अल्पसा प्रयत्नं आहे . असा निर्णय घेणारी सातारा नगरपालिका ही पहिली पालिका असल्याचे सांगून उदयनराजे पुढे म्हणतात कोणतीही पालिका शहराची प्रमुख मातृसंस्था असते . नागरिकांची कामे सहज व पारदर्शीपणे होण्यासाठी सातारा विकास आघाडी सातत्याने आग्रही राहिली आहे .पंधरा वर्षापूर्वी सातारा पालिकेत ७८२ कर्मचारी वर्ग होता ती संख्या आता ४५५ वर येऊन ठेपली आहे . शहराची लोकसंख्या सुध्दा दुप्पट वाढली आहे . राज्य संवर्गातून सुद्धा पालिकेला जे २५ कर्मचारी मिळाले आहेत ते सुध्दा अत्यंत जवाबदारीने काम करत आहेत . नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सातारा शहरासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न आहे .

    गेल्या चौदा महिन्यापासून सुरू असलेल्या करोना महामारीने छोटे मोठे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत . त्यांची अडचण लक्षात घेऊन निवासी व बिगर निवासी मिळकत धारकांच्या घरपट्टी माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे . त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे . मात्र तेवढ्यावरच न थांबता सातारा पालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात ६६९७ मिळकतींना तीन महिन्याच्या मालमत्ता करात ७१ लाख५७ हजार १३रूपयांची सवलत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .केंद्राकडून अतिरिक्त निधी मिळवणे व शासकीय बचत या दोन प्रमुख स्त्रोताद्वारे ही तूट भरून काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे प्रसिध्दी पत्रकात शेवटी उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे