गटतट बाजूला ठेऊन एकदिलाने काम करा; उदयनराजेंच्या नगरसेवकांना कानपिचक्या

  सातारा : सातारा शहरातील प्रस्तावित विकासकामे ही प्राधान्याने झालीच पाहिजेत त्यात कोणतीही हयगय चालणार नाही. सातारा विकास आघाडीत गटातटाचे राजकारण सुरू आहे, हे मतभेद बाजूला ठेऊन सातारकरांसाठी एकदिलाने काम करा, अशा खरमरीत शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या .

  काही महिन्यावर येऊन ठेपलेली पालिकेची निवडणूक, कोरोनामुळे लांबलेली सर्वसाधारण सभा, गुरूवारी होत असलेली स्थायी समितीची ऑनलाईन बैठक, शहरात दोन दिवस उदयनराजेंचा सुरू असलेला दौरा या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक जल मंदिर येथे दुपारी पार पडली .

  खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पक्षप्रतोद निशांत पाटील, सभागृह नेत्या स्मिता घोडके, सांस्कृतिक व क्रीडा विभाग प्रमुख सुजाता राजेमहाडिक, आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक ऍड दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट, तसेच प्रमुख नगरसेवक उपस्थित होते .

  बैठकीत राज्य संवर्गातील इंजिनियर काम करत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. काही अभियंते विरोधकांची कामे करतात आणि प्रत्यक्षात कामाच्या निमित्ताने नगरसेवकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात, अशी थेट तक्रार उदयनराजे समर्थक यांनी अशोक घोरपडे यांनी केली. या अभियंत्यांची तत्काळ बदली करण्याची सूचना उदयनराजे यांनी केली. एका विकास कामाच्या टेंडरवरून दोन नगरसेविकांमध्ये उदयनराजे यांच्यासमोर च जोरदार खडाजंगी झाली.

  प्रलंबित सर्वसाधारण सभा व रखडलेल्या विकास कामांच्या प्रस्तावावर सह्या होत नसल्याने कामाचा निपटारा होत नाही, अशी तक्रार यावेळी स्मिता घोडके यांनी केली, तेव्हा उदयनराजे यांनी थेट नगराध्यक्ष माधवी कदम यांनाच विचारणा केली. तेव्हा विकासकामांचे प्रस्ताव हे माझ्या परस्परच अंतिम होतात शिवाय कामांचे प्रस्ताव येताना तांत्रिकदृष्टया परिपूर्ण नसतात, सूचक व अनुमोदक यांच्या सह्या नसताना, त्यावर सही करताना अडचण होत असल्याचे माधवी कदम यांनी सांगितले.

  तसेच गेल्या पाच वर्षात नगराध्यक्ष फंड कोठे खर्च केला ? त्या कामांची यादी मिळावी याची विचारणा उदयनराजे यांनी नगराध्यक्षांनी केल्याचा खाजगीत काही जणांनी बोलताना केला मात्र आघाडीच्या सूत्रांनी त्याला दुजोरा दिला नाही.

  गटातटाचे राजकारण समोर बैठकीतच समोर आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, सातारा शहराच्या विकास कामांमध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे. पालिकेत येणाऱ्या सर्वसामान्यांची कामे अग्रक्रमाने झालीच पाहिजेत. आघाडीमध्ये दोन-तीन गट पडल्याचे जाणवत आहे.

  येत्या पालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडी एकसंघ दिसायला हवी. साविआने पाच वर्षापूर्वी जो वचननामा दिला होता, त्यातील ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हीच कामे घेऊन आपण लोकांमध्ये जायचे आहे. त्यासाठी गटतट बाजूला ठेऊन एकदिलाने काम करण्याचे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, या बैठकीस नगरसेवक वसंत लेवे, संगीता आवळे, सविता फाळके, विशाल जाधव यांची अनुपस्थिती होती .