राजनंदिनी पवार हिने आंतरराष्ट्रीय ऍबॅकस स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक; पालकमंत्र्यांकडून सत्कार

    वडूज : चायनीज अँड अमेरिका ऍबॅकस असोसिएशन यांच्यामार्फत २२ ऑगस्ट २०२१ रोजी ऍबॅकसची आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. या परीक्षेत संजीवनी प्राथमिक विद्यालय, बनवडी या शाळेची विद्यार्थिनी राजनंदिनी सुरेश पवार (Rajnandani Pawar) हिने सुवर्णपदक मिळवून उत्तुंग कामगिरी केली. याबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तिचा विशेष सत्कार केला.

    ही परीक्षा ऑनलाईन होती. अमेरिका स्थित क्लास मेकर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉगिन करून मुलांना पेपर सोडवायचे होते. कुणीही कॅल्क्युलेटर वापरू नये किंवा इतर कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नये यासाठी सर्व मुलांवर झूम ॲप द्वारे नजर ठेवली जात होती. या परीक्षेसाठी भारत, अमेरिका, हाँगकाँग सिंगापूर, जपान, चीन, मलेशिया, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, तैवान अशा अनेक देशांतून मुले सहभागी झाली होती. भारतातून एकूण १४९ मुलांनी सहभाग घेतला होता. ऍबॅकसचा वापर न करता ३ पेपर ऍबॅकस वापरून १ पेपर आणि बुद्धिमत्तेचा १ पेपर असे एकूण ५ पेपर मुलांना ३० मिनिटांत सोडवायचे होते. एकूण परीक्षा ९०० गुणांची होती.

    राजनंदिनी ऍबॅकस क्लासेस कराडचे सर्वेसर्वा विद्याधर कुलकर्णी व राजनंदिनीचे आजी-आजोबा कांता आनंदराव जाधव यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. ही मुलगी मायणी ग्रामपंचायत मायणीच्या सदस्या अस्मिता सुरेश पवार यांची असून, सर्व स्तरातून तिचे हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.