नारायण राणे यांच्यावरील कारवाईबाबत आठवलेंचे भाष्य; म्हणाले…

  सातारा : जसा मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जातो तसाच केंद्रीय मंत्र्यांचा सन्मान केला पाहिजे. नारायण राणे हे मूळचे कडवट शिवसैनिक. त्यांची कडक भाषा असणारच. परंतु त्यांनी नेमके काय बोलले ते ऐका. देशाच्या स्वातंत्र्यदिनाला 75 वर्ष होत आहेत हे मुख्यमंत्र्यांना आठवले नाही. जेव्हा सोबत आठवले होते तेव्हा आठवले होते. राणे कोणालाही भीत नाहीत. ठाकरे यांनी सत्तेचा दुरुपयोग करत राणेंवर सुडबुद्दीने कारवाई केली आहे. जसा मुख्यमंत्र्यांचा मानसन्मान केला जातो. तसाच केंद्रीय मंत्र्यांचाही करायला हवा, अशी खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. दरम्यान, कितीही कोणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कट कारस्थाने रचली तरीही 2024 ला सत्ता भाजप-रिपाइंचीच येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

  पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सातारा जिह्याच्या दौऱ्यावर रामदास आठवले आले होते. त्यावेळी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, अण्णा वायदंडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रघूनाथ बाबर, किशोरभाऊ गालफाडे, सातारा तालुकाध्यक्ष अप्पा तुपे, श्रीकांत निकाळजे, पशुराम वाडेकर, स्वप्निल गायकवाड, वैभव गायकवाड, रवींद्र बाबर, निखील बल्लाळ, प्रतिक गायकवाड, आदित्य गायकवाड, सचिन वायदंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  यावेळी रामदास आठवले म्हणाले, मध्यंतरी अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. तेथील लोकांना पक्की घरे म्हाडाच्या वतीने बांधण्यासाठी एक-दोन वर्ष लागतील. तोपर्यंत चांगली तात्पुरती घरे राज्य शासनाने द्यावीत. लवकर पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंच्यावतीने करत आहोत. नुकतीच महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणसाठी बैठक झाली. त्या बैठकीला सत्ताधारी पक्षातील शिवसेनेने रिपाइंला बोलवले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनामुळेच भिमसेना आणि शिवसेना एकत्र आली.

  राज्यासह देशात रिपाइंची ताकद आहे. जावली तालुक्यात, भंडारा जिह्यात रिपाइंने ग्रामपंचायत निवडणूक आणल्या आहेत. रिपाइंला त्या बैठकीला बोलवले गेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे आहे. मराठा समाज हा क्षत्रिय समाज, लढवय्या समाज आहे. काळाच्या ओघात बदल झाला असून या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका रिपाइंची आहे. राज्य सरकारने सुप्रिम कोर्टात भक्कमपणे बाजू मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देणं चुकीचे आहे. 2018 ला जे बिल आले त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घ्यावा, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.

  टोलमाफीसाठी रिपाइं आंदोलन छेडणार

  महामार्गावर असलेले टोलनाक्यावर पुण्याच्या धर्तीवर सातारा जिह्यातील नागरिकांना टोलमाफी झाली पाहिजे. एम एच 11, 50 वाहनांना टोल माफी मिळावी, जोपर्यंत टोलमाफी केली जात नाही तोपर्यंत रिपाइं आंदोलन मागे घेणार नाही. टोलमाफीचे आंदोलन रिपाइंच्या वतीने सुरु राहील, असे त्यांनी जाहीर केले.

  मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

  पुढे बोलताना आठवले म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अस म्हटलं होते की हे वर्ष स्वातंत्र्य दिनाचे 75 वं वर्ष आहे. अमृतवर्षं आहे. ते मुख्यमंत्री यांना आठवले नाही. त्यावेळी मुख्यमंत्री यांना आठवले नाही जेव्हा आठवले सोबत होते तेव्हा आठवले, अशी टीप्पणी करत पुढे म्हणाले, जसा मुख्यमंत्री यांचा सन्मान केला तसा केंद्रीय मंत्री यांचाही सन्मान केला पाहिजे. नारायण राणे यांची भाषा शिवसेनेची. ते कोणाला भीत नाहीत. घटना घडल्यानंतर मी त्यांच्या भेटीला गेलो होतो. रिपाई त्यांच्या पाठीशी आहे. इतर गुन्हेगारांना लगेच अटक होत नाही. पण राणेंना अटक केली. सत्तेचा दुरुपयोग केला आहे. सूड बुद्धीने उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा वापर केलाचा आरोप केला.

  पुन्हा 2024 ला भाजपचीच सत्ता

  नुकतीच उद्धव ठाकरे याणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. एकत्र येवून राज्यात सत्ता स्थापन करावी, असे वाटते. केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा योजना, उज्वला योजना योजनांचा फायदा तळागाळातील लोकांना झालेला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात किती कट-कारस्थान केले तरी 2024 ला बीजेपी आणि रिपाइंचे सरकार येईल, असा दावा त्यांनी केला.