कोरोनामुळे पतीचा मृत्यू झालेल्या विधवा भगिनींचे पुनर्वसन करावे; सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी

कोरोना महामारीत अनेकांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात 20 ते 50 वयोगटातील सुमारे सहाशे महिला कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने विधवा झाल्या आहेत.

    वडूज : कोरोना महामारीत अनेकांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात 20 ते 50 वयोगटातील सुमारे सहाशे महिला कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने विधवा झाल्या आहेत. महाराष्ट्रात हाच आकडा सुमारे 20 हजार इतका आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे विधवांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कोरोनावरील उपचार घेताना पतीचा मृत्यू झाला असेल तर लाखो रुपयांचे वैद्यकीय बिल कर्ज म्हणून त्यांच्या डोक्यावर आहे. घरात खाणारी तोंड आहेत पण त्यांच्या हाताला कोणतेही काम नाही. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, वाढती महागाई, घर खर्च असे प्रश्न त्यांच्या पुढे आहेत. या विधवा भगिनींचे पुनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव प्रा. कविता म्हेत्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देऊन केली.

    राजस्थान, बिहार, आसाम, तामिळनाडू इत्यादी राज्यांनी अशा विधवांना पेन्शन किंवा आर्थिक मदत जाहीर केली आहे. आपल्याही राज्यात राज्य सरकारने अशा योजनांचा विचार करून विधवांना आर्थिक मदत करण्यासंबंधीचा विचार व्हावा.
    आज विधवांच्या पुढे अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. काहींना कौटुंबिक हिंसाचारला तोंड द्यावे लागत आहे. संपत्तीत वारसा हकक न मिळणे, बेरोजगारीचा प्रश्न, महागाई याचा विचार करता शासनाने विधवा महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना कराव्यात, शासकीय योजना त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सूचना कराव्यात, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत अशा गरजू महिलांपर्यंत पोहचावे.

    शासकीय नोकरीत प्राधान्य द्यावे, अन्नसुरक्षा अंत्योदय योजनेमध्ये त्यांचा समावेश करून घेण्यात यावा. मुलांच्या शिक्षण आणि मुलींच्या लग्नाच्या संदर्भात शासनाने काही आर्थिक मदत करावी करावी. काही ठोस उपाययोजना उपलब्ध करून देवून विधवांचे पुनर्वसन करावे किंबहुना अशा महिलांसाठी विधवा महिला धोरण आखण्यात यावे. या विधवांच्या प्रश्नात लक्ष घालून महाविकास आघाडीने विधवा महिलांच्या पाठीशी राहावे आणि त्यांना न्याय द्यावा अशा स्वरूपाची मागणी प्रा. कविता म्हेत्रे यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.