अंबेनळी घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

    महाबळेश्वर : गेल्या दीड महिन्यांपासून अंबेनळी घाटातील वाहतूक गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असून, घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी आता काॅंक्रिट टाकण्याचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या चार दिवसात महाबळेश्वर पोलादपूर मागार्वरील वाहतूक पूवर्वत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबेनळी घाटातील रस्ता तुटून दरीत कोसळला होता. तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्या होत्या. अशाप्रकारे एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर घाटातील रस्त्याचे नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ होती. 21 जुलैपासून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेली दीड महिना ही वाहतूक बंद आहे. ही वाहतूक सुरू करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम विभागाने घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. मुसळधार पावसात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे काम सुरू करून केवळ दीड महिन्यात रस्ता दुरूस्तीचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पुढील चार दिवसात या मागार्वरील वाहतूक सुरू होण्यास मदत होणार आहे. या मार्गावरील वाहतुक सुरू होताच किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली 22 गावेही आता महाबळेश्वर तालुक्याशी पुन्हा जोडली जाणार आहे.

    अंबेनळी घाटातून वाहतूक सुरू होताच किल्ले प्रतापगडावरील पर्यटन सुरू होणार असून, पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांची उपासमार आता थांबणार आहे. शेकडो स्थानिकांचा आता रोजगार सुरू होण्यास मदत होणार आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक चाकरमानी यांना उत्सवासाठी कोकणात जाता येणार आहे. अनेक लोक रस्ता नसल्याने गावी अडकून पडले होते, अशा सर्वांना आता बाहेर पडता येणार आहे. वाई येथून अंबेनळी घाट मार्गे कोकणात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला जातो. ती वाहतूक गेली दीड महिना बंद पडली होती. आता ही वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. अशाप्रकारे सातारा जिल्ह्याचे लक्ष या अंबेनळी घाटातील रस्त्याकडे लागले आहे.