पडळ येथील खटाव माण ऍग्रो कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचे रोलर पूजन

    वडूज : पडळ ता खटाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या खटाव माण ऍग्रो साखर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे, प्रकाश घार्गे, प्रीती घार्गे याच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळी संपन्न झाला. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक अमोल पवार, आण्णासाहेब निकम, ऍड. धनाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी संचालक विक्रम घोरपडे म्हणाले, कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, को- चेअरमन मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव माण साखर कारखान्याची आजवरची वाटचाल यशस्वी असून, यात सर्व शेतकरी, कर्मचारी, कंत्राटदार, उस तोडणी कामगार यांचा मोठा वाटा असून यापुढेही सर्वांना विश्वासात घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठीच कारखान्याचे निर्माते व संचालक मंडळ कार्यरत राहणार आहेत.

    दरम्यान, मान्यवरांच्या शुभहस्ते रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याने २०२१-२२ या कालावधीतील तिसऱ्या गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने कारखान्यातील सर्व मशिनरींच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. संचालिका प्रीती घार्गे म्हणाल्या, घार्गे व मनोज यांच्या योग्य नियोजनांनुसार वाटचाल करणारा हा कारखाना आज आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, आज अखेर शेतकऱ्यांचे बिल, कामगारांचे पगार, कंत्राटदार ऊसतोडणी कामगार यांच्या बिलाची तातडीने पूर्तता करण्यात आली आहे. तसेच यंदाच्या हंगामाअखेर डिस्लरी प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

    या कार्यक्रमास कारखान्याचे टेक्निकल डायरेक्टर नरेंद्र साळुंखे, चीफ इंजिनिअर काकासाहेब महाडिक, इलेक्ट्रिकल मॅनेजर दत्तात्रय घोरपडे,चीफ अकाउंटट अजित मोरे, मुख्यशेती अधिकारी किरण पवार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार व सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले.