रोटरी क्लबचे काम सर्वांना दिशादर्शक : नितीन दोशी 

    म्हसवड : रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट यांच्यामार्फत विरकरवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल व म्हसवड येथील ज्ञानवर्धिनी हायस्कूलला डिजिटल क्लासरूमसाठी लागणारा स्मार्ट एलईडी शाळेस भेट देऊन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना डिजिटल शिक्षण देऊन, दिशा देण्याचे काम वैभव पोरे करीत असल्याचे मत म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी व्यक्त केले.

    ते विरकरवाडी येथे नवीन डिजिटल क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी रोटरी क्लबचे समन्वयक वैभव पोरे, म्हसवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी, माजी नगरसेवक कैलास भोरे, मुख्याध्यापक सी.एम.कोकरे, जी. डी. मासाळ, महेश कांबळे, लुनेश विरकर, सुशील त्रिगुणे आदीसह शिक्षक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    हा स्मार्ट एलईडी हा एक लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचा असून, त्यामध्ये सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम लोड करून आनंददायी शिक्षणाच्या सर्व पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. एवढ्या किंमतीचा हा डिजिटल क्लासरूम शाळेला फक्त पंचवीस हजार रुपयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातील काही रक्कम सह्याद्री इंडस्ट्रीज, रोटरी क्लब पुणे व वैभव पोरे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ वैभव पोरे अशा तिघांच्या माध्यमातून ही रक्कम वैभव पोरे यांनी उभा केली आहे.

    त्यामुळेच एक लाख पंचवीस हजार रुपयांचा डिजिटल क्लासरूम फक्त शाळांना पंचवीस हजार रुपयातच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये विरकरवाडी हायस्कूलचे पंचवीस हजार रूपये शाळेच्या सहशिक्षिका संध्या विरकर यांनी देऊ केले. तर वळई हायस्कूलचे पंचवीस हजार रूपये म्हसवड हायस्कूलचे सहशिक्षक आर. टी. काळेल यांनी देऊ केले.

    वैयक्तिक पंचवीस हजार रुपये शाळेला डिजीटल क्लासरूमसाठी दिल्याबद्दल संध्या विरकर व आर. टी. काळेल यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचदरम्यान पोरे यांनी विरकरवाडी हायस्कूलच्या हाॅल, चार वर्ग खोल्या, व्हरांडा, आदीसाठी लागणारी सर्व फरशी देण्याचे वैभव पोरे शब्द दिला. त्यावेळी त्यांनी विरकरवाडी व म्हसवड हायस्कूल प्रत्येकी पाच हजार किमतीची पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली.