दोन कोटी रुपयांच्या हस्तांतरणाला ग्रामविकासची मंजूरी : उदयनराजे भोसले

  सातारा : हद्दवाढ होण्यापूर्वी, जिल्हा परिषदेस 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाने पूर्वीच्या शाहुपूरी विलासपूर, खेड या ग्रामपंचायतीकरीता दिलेला निधी हद्दवाढ झाल्याने, नगरपरिषदेला वितरित करण्याबाबत आम्ही राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना 24 ऑगस्ट रोजी आणि त्यापूर्वी प्रस्तावित केले होते. त्यानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला या भागासाठी प्राप्त झालेला सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यास हसन मुश्रीम यांनी मंजूरी दिली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी दिली आहे.

  याविषयी उदयनराजे भोसले यांनी अधिक माहिती देताना जलमंदिर पॅलेस येथून प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे नमूद केले आहे की, केंद्राने ग्रामीण विकासासाठी 15 व्या वित्त आयोगामधून बंधित निधीचा पहिला हप्ता, ग्रामपंचायत, पंचायतसमिती, जिल्हापरिषद स्तराकरीता 10:1080 या प्रमाणात वितरीत केला होता. दरम्यानच्या काळात, संपूर्ण शाहुपूरी, विलासपूर, खेड, दरे या ग्रामपंचायतींचा भाग सप्टेंबर 2020 मध्ये सातारा नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्यात येवून, सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला.

  तत्पूर्वी जुन्या ग्रामपंचायतींच्या विकासाकरीता 15 व्या वित्त आयोगातील पंचायत समिती आणि जिल्हापरिषद स्तरावरील अनुक्रमे 10 टक्के आणि 80 टक्के निधी संबंधित यंत्रणेकडेच जमा होता. आता हद्दवाढी नाविष्ट झालेल्या भागाचा विकास पंचायतसमिती किंवा जिल्हापरिषद करु शकत नसल्याने, या भागाच्या विकासासाठी त्यांचा हिस्सा नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

  तसेच प्रस्ताव पाठविल्यावर हसन मुश्रीफ यांची समक्ष भेट घेवून तसेच दिनांक 24 ऑगस्ट रोजी पत्र देवून सदरचा सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार नुकतीच हा सुमारे 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यास मुश्रीफ यांनी मंजूरी दिलेली आहे.

  लवकरच जिल्हापरिषदेच्या स्तरावरुन सदरचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग केला जावून हद्दवाढ भागातील कामे पूर्ण करणासाठी जादा निधी उपलब्ध होईल. नगरपरिषदेने नुकत्याच झालेल्या तिच्या मे स्थायी आणि मे सर्वसाधारण सभेमध्ये हद्दवाढ भागासाठी विविध अत्यावश्यक कामे नगरपरिषदेच्या निधीतुन मंजूर केलेली आहेत. अशावेळी हद्दवाढ भागातील प्रलंबित निधी जिल्हा परिषदेकडून या भागाच्या विकासासाठी सुमारे अडीच कोटी निधी उपलब्ध होत असल्याने भागातील अतिआवश्यक कामे पूर्ण होण्यास कोणती समस्या उद्भवणार नाही.

  हद्दवाढ भागासह शहराचा सातत्यपूर्ण विकास साधण्याचा सातारा विकास आघाडीने दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होत असल्याने त्याचे विशेष समाधान आहे, असेही उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमूद केले आहे.