संभाजीराजे माझे धाकटे बंधू, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत : उदयनराजे भोसले

  सातारा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे बंधू आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे उद्या उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. पक्ष कोणता का असेना मराठा आरक्षणासाठी आता अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले. आरक्षण हे वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आलं, कोणाचं काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का?, असा सवालही यावेळी उदयनराजेंनी उपस्थित केला. तसेच गायकवाड समितीचा अहवाल त्याचं व्यवस्थित वाचन झालं नाही, झालं असतं तर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला नसता, असेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

  राज्याभिषेक सोहळा भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना

  श्री शिवराज्याभिषेक : भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासंबंधी बोलताना उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना मानली जाते. ६ जून १६७४ मध्ये महाराजांनी केलेल्या विधियुक्त राज्याभिषेकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. या राज्याभिषेकामुळे महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यास कायदेशीर बैठक प्राप्त झाली. राज्यभिषेकाच्या माध्यमातून महाराजांनी जुलमी राजवटी उलथवून टाकून नवं स्वराज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेक ही संपूर्ण देशात लोकशाही राज्याची संकल्पना साकारणारी घटना होती.

  अवघ्या वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याचा विचार

  महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याचा विचार करून तो प्रत्यक्षात साकारणे हे एक अलौकिक कार्य होते. त्यादिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन झाली, असं आपण मानतो. त्यामुळेच पावणे चारशे वर्षे झाली तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वत्र अधिराज्य करीत आहे. कारण महाराजांनी जे राज्य उभं केलं ते रयतेसाठीच…मूघल, आदिलशाही अशा परकीय सत्तांची शेकडो वर्षाची जुलमी राजवट संपुष्टात आणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. आपल्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष होता. शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांना संरक्षणाबरोबरच सन्मानाची वागणूक मिळत होती.

  माँ जिजाऊसाहेबांच्या शिकवणीतून महाराजांना प्रेरणा

  मॉं जिजाऊसाहेबांच्या शिकवणीतून महाराजांना सतत प्रेरणा मिळायची. या राज्याभिषेकानंतर अनेक घडामोडी घडत होत्या. खरेतर कायद्याच्या राज्यात ज्या-ज्या सुधारणा आवश्यक असतात, त्या-त्या सुधारणा महाराजांनी प्रत्यक्षात साकारण्यास सुरूवात केली. अनेक बारीक-सारीक गोष्टींचा विचार महाराजांनी प्रत्यक्षात आणला. त्या काळात फार्सी भाषेचा प्रभाव वाढलेला होता. त्यामुळे मराठी भाषा मागे पडण्याची भीती होती. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेचा प्रभाव काढून टाकण्यासाठी फार्सी-मराठी अशा शब्दकोशाची निर्मिती करून घेतली. तो ‘राज्यव्यवहार कोश’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर राज्याभिषेकाच्या दिवसापासून महाराजांनी तत्कालीन शालिवाहन शक ऐवजी स्वत:च्या राज्याचे शक सुरू केले. हे नवीन शक ‘श्री राज्याभिषेक शक’ म्हणून अस्तित्वात आले, त्याला आपण ‘शिवशक’ असे म्हणतो. त्याचा उल्लेख अनेक पत्रांमध्ये पाहायला मिळतो. ही लोकशाही व्यवस्थाच होती. आजही महाराजांची शेकडो पत्रे उपलब्ध आहेत. या पत्रांवरूनच महाराजांनी आपले नाव राजश्री शिवाजीराजे भोसले हे बदलून श्री राजा शिवछत्रपती असे केले होते, हेही लक्षात येते.

  शत्रूची शासनपद्धती मोडित

  महाराजांनी आपल्या नावापुढे ‘छत्रपती’ म्हणजेच ‘छत्र धारण करणारा, छत्राचा अधिपती’ अशी बिरुदावलीही लावून घेतली होती. अखंड भारतात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, त्याचबरोबर पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच या सर्वांशी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूची शासन पद्धती मोडून काढली. छत्रपती शिवराय हे लोकशाही मूल्यांची व्यवस्था रूजविणारे द्रष्टे राजे होते. त्यांच्या विचारांचा आदर प्रचलित लोकशाहीच्या माध्यमातून व्हायला हवा, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.