बेकायदा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांचा भरारी पथकावर हल्ला

माणच्या तहसिलदार माने यांनी वाळू तस्करांविरोधात धडक कारवाया करण्यास सुरुवात केली असल्यानेच, माणमधील वाळु तस्करीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी अद्यापही चोरी सुरुच आहे. याच चोरट्यांना लगाम घालण्यासाठी तहसिलदारांनी भरारी पथक नेमले आहे. आता याच पथकावर वाळु चोर हल्ले करु लागलेत

    म्हसवड : माण तालुक्यातील काळ्या सोन्याला जिल्ह्यासह राज्यभरात मोठी मागणी असल्याने येथील काळ्या सोन्याला मोठी झळाळी आली, असून या झळाळीतून आपलाही लखलखाट व्हावा यासाठी तालुक्यातील तस्कर पुढे सरसावले आहेत, आजवर या तस्करांकडुन अनेकदा महसुलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिवघेणे हल्ले झाले आहेत तर या पुर्वी म्हसवड येथील एका कोतवालाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच वाळू तस्करी रोखणाऱ्या भरारी पथकावरच हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
    या घटनेत भरारी पथकातील काही कर्मचाऱ्यांना जमावाने हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ दमदाटी करुन सदरचे वाळूचे वाहन वाळूसह पळवून नेल्याचा गुन्हा म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.  माण तहसीलदारांच्या आदेशाने माण तालुक्यात सुरु असलेल्या चोरटी वाळूची वाहतूकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली की ढाकणी पानवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळूची अवैध चोरटी वाहतूक सुरु आहे.त्याप्रमाणे भरारी पथकाने या रस्त्यावर दबा धरुन भरारी पथक बसले त्याच दरम्यान रवि राजेंद्र खाडे रा पळशी ता.माण जि सातारा हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचे डि आय २०७ माँडेलचे पिकअप एम एच ५० – ५०६९ वाहनात एक ब्रास वाळू स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विना परवाना चोरटी वाहतूक करत असताना मिळून आला असता त्यास आम्ही सदरचे वाहन पोलिस ठाण्यात घेऊन चल असे बोलुन त्याचेवर कारवाई करीत असताना त्याने त्याचे फोन वरुन फोन करुन २० ते २५ लोकांना बोलावून घेऊन जमाव जमवून त्याने जमलेल्या जमावाने दहशत निर्माण करुन आमच्या शासकीय कामात अडथळा आणून मंडलाधिकारी शरद सानप, सिध्दनाथ जावीर,भरत कर्ण,श्याम सुर्यवंशी,या भरारी पथकातील महसूल कर्मचाऱ्यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन सदरचे वाहन वाळूसह पळवून नेहुन वाळूची चोरी केल्याची माहिती भरारी पथकाने दिली आहे. या प्रकरणी रवि राजेंद्र खाडे व इतर २० ते २५ जणांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. या घटनेचा तपास म्हसवड पोलिस करीत आहेत.

    माणच्या तहसिलदार माने यांनी वाळू तस्करांविरोधात धडक कारवाया करण्यास सुरुवात केली असल्यानेच, माणमधील वाळु तस्करीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी अद्यापही चोरी सुरुच आहे. याच चोरट्यांना लगाम घालण्यासाठी तहसिलदारांनी भरारी पथक नेमले आहे. आता याच पथकावर वाळु चोर हल्ले करु लागल्याने तहसिलदार माने यावर कोणती भू मिका घेतायेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.