केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा सातारा भाजपतर्फे निषेध

    सातारा : भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. भाजप सातारा जिल्हा शाखेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. या संबंधीचे निवेदन, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना देण्यात आले.

    निवेदनात म्हटेल की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्य सरकारने अटक केली असून, सदर अटक ही पूर्णपणे राजकीय सुडबुध्दीने करण्यात आली आहे. भाजपच्या जनादेश यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळे अगोदरच दोन ते तीन दिवस जनादेश यात्रेच्या विरुद्ध मुंबईमध्ये ४० च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आले.

    याचाच पुढचा सुडाचा अध्याय म्हणून कायद्याला धाब्यावर बसवून आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून बेकायदेशीरपणे ही अटक करण्यात आली. त्यांना जरी न्यायालयाने जामीन दिला असला तरी पोलीस प्रशासनास दमदाटी करून ठाकरे सरकारने केलेल्या भ्याड कृत्याचा, अटक सत्राचा, या घटनेचा भारतीय जनता पार्टीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या विविध ठिकाणच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या समाजविघातक शक्तींना वेळीच अटकाव करावा त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्य कायदा, सुव्यवस्थेचा धरून चालवण्याची सुबुद्धी राज्य सरकारला येवो, अशी प्रार्थना सुद्धा निवेदनात व्यक्त करण्यात आली. निवेदनाची प्रत माहिती आणि कार्यवाहीसाठी राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आली आहे.

    यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, माजी जिल्हा उपाध्यक्ष रवी पवार, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. उत्कर्ष रेपाळ, औद्योगिक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, सातारा शहर चिटणीस रवी आपटे, ओबीसी मोर्चा युवती जिल्हा अध्यक्ष वनिता पवार, महिला मोर्चा सातारा शहर सरचिटणीस हेमांगी जोशी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते