आधारलिंकमध्ये सातारा जिल्हा ठरला देशात अव्वल; पोस्ट ऑफिसअंतर्गत मोहीम

  सातारा : संपूर्ण देशभरामध्ये पोस्ट ऑफीस अंतर्गत आधारला मोबाईल लिंक करण्याची मोहिम (Aadhar Link Campaign) राबविण्यात आली होती. या योजनेअंर्तगत सातारा जिल्ह्यातील 1 लाख 52 हजार 813 नागरिकांनी आपले आधार मोबाईल लिंक करून घेतले आहे, अशी कामगिरी करणारा सातारा टपाल विभाग देशात अव्वल ठरला आहे, अशी माहिती सातारा डाक विभागाच्या प्रवर अधीक्षक अपराजिता म्रिधा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  त्या पुढे म्हणाल्या, आधार मोबाईल लिंकिंग मोहिम सातारा जिल्ह्यातही 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आली. या मोहिमेला जिल्ह्य़ातून उत्तम प्रतिसाद मिळाला. आधारद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी आधारला मोबाईल लिंक करण्यासाठी सातारा डाक विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सातारा पोस्ट विभागाचे नाव देशात अव्वल झाले आहे.

  शासनाच्या सवलत योजनांसाठी आधार लिंक गरजेचे असून, या मोहिमेत जिल्हय़ातील 1 लाख नागरिकांचे आधारलिंक करण्याचा मानस सातारा पोस्ट विभातर्फे आखण्यात आला होता. पण त्याहून ही अधिक म्हणजे 30 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पर्यंत 1 लाख 52 हजार 813 नागरिकांनी आधार लिंकिंक केल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोस्ट विभागातील कर्मचाऱयांनी आपल्या कामकाजाच्या वेळेपेक्षा ही अधिक वेळ कार्यालयात राहून ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, तसेच देशात अव्वल येण्याचा मान ही पटकाविला आहे.

  इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत नागरिकांना बँकिंग सेवा दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोस्टमनच्या माध्यमातून जिल्ह्यातील 700 हून अधिक पोस्ट कार्यालयातून युआयडीएआय आधारला मोबाइल लिंकिंग सेवा देण्यात आली. आधारला मोबाइल लिंक केल्यास आधारशी लिंक असलेल्या इतर माहितीचा दुरूपयोग इतर कोणी करू शकणार नाही. तसे झाल्यास लिंक असलेल्या मोबाइलवर लगेच मेसेज जातो. त्यामुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसणार आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सातारा डाक विभागाचे डाक विभागाने आधारला मोबाइल लिंकिंगची मोहीम सुरू केली आहे. पोस्टमनद्वारे आधार अपडेट, मोबाईल लिंक करण्यात आले.

  वेळेची मर्यादा न पाळता मोहिम केली यशस्वी

  पोस्ट विभागातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहिमे अंतर्गत पोस्ट विभातील कर्मचाऱ्यांतर्फे नागरिकांच्या घरी जाऊन, कॅम्प लाऊन ही मोहिम राबविण्यात आली. तसेच वेळेची मर्यादा न पाळता ग्रामीण डाक सेवक आणि पोस्ट विभागाच्या बांधवांनी ही मोहिम यशस्विरित्या पार पाडली आहे. गुरूवारीही रात्री उशीरापर्यंत ही मोहिम राबविण्यात येत होती.

  कर्मचाऱ्यांचे विशेष श्रेय

  आधार लिंकिंग मोहिमेला नागरिकांनी अधिक प्रमाणात प्रतिसाद दिला. याचे सर्वाधिक श्रेय हे सातारा जिल्ह्यातील पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांना जाते. कारण, कित्येक कर्मचाऱ्यांनी तर पहाटे पाचपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत नागरिकांचे आधार लिंकिंग करण्याचे काम केले होते. त्यामुळे सातारा जिल्हा पोस्ट विभागाचे नाव देशात उंचाविले गेले आहे.

  – अपराजिता मिध्रा, प्रवर अधीक्षक, सातारा डाक विभाग.