साताऱ्याचा सराफ कट्टा सोमवारपासून बंद

    सातारा : केंद्र सरकारने 2013 साली हॉलमार्किंगचा कायदा आणला. सर्व सराफांनी त्याची अंमलबजावणी केली व मान्य केला. पण 15 जून 2021 ला लॉकडाऊन उठल्यानंतर शासनाने एचयूआयडी हा नवीन कायदा आणला आहे. तो व्यापाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी जाचक आहे. त्याच्या निषेधार्थ सातारची सराफ पेढी सोमवारपासून बंद राहणार आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे सातारा सराफ असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

    त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, केंद्र शासनाने हॉलमार्किंग कायद्यानंतर एचयूआयडी हा नवीन कायदा आणला आहे. तो व्यापाऱ्यांसाठी व ग्राहकांसाठी जाचक आहे. त्यामध्ये व्यापाऱ्यांनी व्यापार करण्यापेक्षा त्यांच्या नोंदी अनेक ठिकाणी कराव्या लागणार आहेत. तसेच दागिन्यांवर सराफाचे ओळख चिन्ह नाही, दागिन्यांची सुरक्षा नाही, बदलाची तरतूद नाही, डेटा गोपनियता नाही अशा सर्व घातक प्रक्रियांची तरतूद आहे.

    एचयूआयडी कायद्यानुसार एकच दागिना खरेदी केल्यावर तो दागिना बदलायचा झाल्यास किंवा त्या दागिन्यामध्ये काही बदल करण्याचा झाल्यास या एचयूआयडी कायद्यामुळे कोणताही बदल करता येणार नाही. त्याबद्दल ग्राहकांची नाराजी व्यापाऱ्यांवर होणार आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.