सातारा : विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची होणार कोरोना चाचणी ; पालिका आणि पंचायत समितीकडून कारवाईसाठी स्वतंत्र पथके

गेल्या काही दिवसांपासून विनाकारण फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली. तरीही त्यांची संख्या कमी होत नव्हती. आज आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरात १७८ तर सातारा तालुक्यात ४७७ असे एकूण ६५५ रुग्ण बाधित आढळले आहेत . सातारा तालुक्यात कंटेन्मेंट झोनची संख्या २८१ वर पोहोचली आहे . कोरोनाचे संक्रमण झपाटयाने पसरत असताना कडक लॉक डाऊनमध्ये रस्त्यावरची गर्दी कमी होईनाशी झाली आहे

    सातारा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी पालिका आणि पंचायत समितीवर साेपिण्यात आली आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी गुरूवार पासून सुरू झाली . रॅपिड अँटिजेन टेस्ट करणारी व्हॅन सातारा शहरात फिरू लागल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .पहिल्या दिवशी सात जणांची टेस्ट करण्यात आली .

    याबाबतचा आदेश सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तहसिलदार आशा हाेळकर यांनी काढला आहे. हा आदेश प्राप्त होताच पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तत्काळ वाहनं उपलब्ध करून एक डॉक्टर एक तंत्रज्ञ, एक पोलीस व एक नर्स असे पथक रवाना केले .

    गेल्या काही दिवसांपासून विनाकारण फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली. तरीही त्यांची संख्या कमी होत नव्हती. आज आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरात १७८ तर सातारा तालुक्यात ४७७ असे एकूण ६५५ रुग्ण बाधित आढळले आहेत . सातारा तालुक्यात कंटेन्मेंट झोनची संख्या २८१ वर पोहोचली आहे . कोरोनाचे संक्रमण झपाटयाने पसरत असताना कडक लॉक डाऊनमध्ये रस्त्यावरची गर्दी कमी होईनाशी झाली आहे . त्यामुळे शहरात इतरत्र फिरणाऱ्यांच्या चाचणीचा निर्णय प्रशासनाने घेतला. सातारा शहर आणि तालुक्यांत गेल्या दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने तात्काळ विनाकारण फिरणाऱ्यांना लगाम बसावा यासाठी करोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. पालिका आणि पंचायत समितीने पोलिस आणि आराेग्य विभागाच्या मदतीने ही चाचणी करायची आहे. यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे सूचित करण्यात आले आहे. सातारा शहरात दुपारी साडेतीन नंतर शहरात फिरणाऱ्या सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची तत्काळ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली . मात्र सुदैवाने कोणाचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही . प्रशासनाच्या आदेशानूसार शहरातील काेणत्याही भागात पथक विनाकारण फिरणा-यांना चाप बसवेल अशी आशा आहे. लोकांना करोना संक्रमणाचे गांभीर्य कळावे हा या झटपट टेस्ट मोहिमेचा हेतू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ दादासो पवार यांनी सांगितले .