साताऱ्यात ३९ पोती गुटखा जप्त

हा गुटखा राज्यामध्ये विक्री करण्यास बंदी असल्याने त्याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन कार्यालय सातारा यांना रिपोर्ट देण्यात आला असून शाहुपूरी पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे

    सातारा: अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी आणल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार पेठ, सातारा येथे मोठी कारवाई केली असून गुटखा पानमसाल्याची तब्बल ३९ पोती व बोलेरो जीप असा साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी शाहरुख उर्फ मुबीन अस्लम बागवान वय २८ वर्षे रा ५९, बुधवार पेठ सातारा यास पोलिसांनी अटक केली आहे.

    याबाबत माहिती अशी, राज्यामध्ये गुटख्यास बंदी असताना सातारा शहरातील बुधवार पेठ येथे एकजण त्याच्या घरी बोलेरो पिकअप जीप (एम. एच ४२ एम ४५१९) मधून हिरा गुटख्याची पोती घेवून विक्री करीता आणणार असल्याची माहिती एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यांनी तात्काळ एलसीबीचे सपोनि रमेश गर्जे व पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सपोनि रमेश गर्जे व पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा लावला. दि ४ रोजी सकाळी ०९.३० च्या सुमारास एकजण बुधवार नाका येथील त्याच्या राहते घरासमोर संबंधित बोलेरो पिकअप जीप घेवून आला. त्यास पोलिसांनी पकडून त्याच्या ताब्यातून हिरा पान मसाल्याची २६ पोती, रॉयल तंबाखू ७१७ ची १३ पोती आणि बोलेरो जीप असा एकुण १० लाख ५२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    हा गुटखा राज्यामध्ये विक्री करण्यास बंदी असल्याने त्याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन कार्यालय सातारा यांना रिपोर्ट देण्यात आला असून शाहुपूरी पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनाप्रमाणे व एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक मदन फाळके , स.फौ.जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, पो. ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, रवि वाघमारे, निलेश काटकर, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रविण कांबळे, पो. कॉ. विक्रम पिसाळ, वैभव सावंत, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार यांनी ही कारवाई केलेली आहे.