स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साताऱ्यात सत्याग्रह आंदोलन

    सातारा : राज्य आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रतिकात्मक मीठ घेऊन महात्मा गांधीजींची भजने म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्याग्रह आंदोलन केले. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी एकरकमी द्यावी, महावितरण कंपनीने अन्यायकारक वसुली थांबवावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारीणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

    त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील ऊसबिल अद्याप दिले नाही ते तातडीने व्याजासह मिळावे व ते बेकायदेशीर अडवून ठेवले म्हणून कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ऊस नियंत्रण अध्यादेश कायदा 1966 मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचा एफआरपीचे तुकडे करण्याचा प्रस्ताव कायमचा रद्द करुन एक रक्कमी ऊस दर देण्यात यावा. शेतकऱ्यांना अनिवार्यपणे करण्यात आलेली ई-पीक पाहणी रद्द करुन ती शासकीय यंत्रणेकडुनच करावी.

    सर्व भरती प्रक्रियेत (स्पर्धा परीक्षा, पोलीस, आर्मी भरती) बदल करून 5 वर्षापर्यंत वय वाढवून तशी अंमलबजावनी सर्व स्पर्धा परीक्षांपासून ते सरकारी नोकरीपर्यंत करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.