म्हसवड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सविता म्हेत्रे

म्हसवड पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी गटाच्या सविता राहुल म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    म्हसवड : म्हसवड पालिकेच्या (Mhaswad Municipal Council) उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी गटाच्या सविता राहुल म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा कलाबाई पुकळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम पालिकेत लागला होता.

    त्यानुसार आज पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे सत्ताधारी गटाकडून सविता राहुल म्हेत्रे यांचे ३ अर्ज दाखल करण्यात आले तर विरोधी गटाकडून एक ही अर्ज दाखल न झाल्याने सविता म्हेत्रे यांनी आपले दोन अर्ज माघारी घेत तर एकमेव राहिलेल्या अर्जामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले.

    यावेळी नूतन उपनगराध्यक्ष सविता म्हेत्रे यांचे नगराध्यक्ष तुषार विरकर, गटनेते धनाजी माने, युवा नेते, माजी नगरसेविका प्रा. कविता म्हेत्रे, ऍड. पृथ्वीराज राजेमाने यासह सत्ताधारी व विरोधी गटाकडून अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, सविता म्हेत्रे यांची पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची जोरदार आतिषबाजी करीत गुलालाची उधळण केली तर शहरातून त्यांची सवाद्य मिरवणूक काढली.