पुन्हा बँक घोटाळा; तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गंडा, गुन्हा दाखल

संस्थापक संचालक नंदकुमार खामकर व संचालक वजीर शेख यांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी संचालक व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून सदर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप.

  ओझर्डे : बोगस कागदपत्रे व दस्तऐवजाच्या साह्याने ११२ बनावट कर्ज प्रकरणे तयार करून बँकेच्या ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३३४ रुपये निधीचा गैरविनियोग व अपहार करून सभासद आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचे (Harihareshwar Sahakari Bank) संस्थापक संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, व्यवस्थापक व रोखपाल यांच्यासह एकूण २९ जणांवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे सहकार व बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

  संस्थापक संचालक नंदकुमार खामकर व संचालक वजीर शेख यांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी संचालक व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून सदर निधीचा गैरवापर केल्याचे सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक ( वर्ग १) विजय दत्तात्रय सावंत यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

  बनावट नावावर उचलले कर्ज

  सन २०११-१२ ते ३१ मार्च २०१९ अखेर हरिहरेश्वर बँकेने दिलेल्या कर्ज प्रकरणांची छाननी केली असता संस्थापक संचालक नंदकुमार खामकर यांनी ‘हरिहरेश्वर डेव्हलपर्स’ या फर्मच्या नावे सोनगीरवाडीतील सर्व्हे नं. ७१/२ व सर्व्हे नं.२५/१अ/२/३ या मिळकतींवर ६२ बोगस कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे, दस्तऐवज, गहाणखत करून  बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून बँकेतून संबंधितांचे नावे कर्ज घेतले. संचालक वजीर शेख यांनी अशाच प्रकारे ‘एशियन डेव्हलपर्स’ या फर्मच्या नावे सिटीसर्व्हे नं. १२२४, २९२४, ६६५,५८७,३२७ सर्व्हे नं. १०८/२ इत्यादी मिळकतींवर ५० बोगस कर्जदारांच्या नावे कर्ज घेवून बँकेच्या सभासंदाची व ठेवीदारांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

  स्वार्थासाठी पदाचा गैरवापर

  या दोघांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी ११२ बनावट कर्जप्रकरणे तयार करून बँकेच्या २६ कोटी ७८ लाख ८ हजार, ७८९ रुपये निधीचा गैरविनियोग केला आहे. सन २०१५-१६, २०१८-१९ या कालावधीत या ११२ बनावट कर्ज खात्यावर प्रत्यक्षात रक्कमेचा भरणा न करता वर भरणा केल्याचे दर्शवून १० कोटी २४ लाख ४२ हजार १५४ रूपयांचा अपहार केला आहे. याशिवाय काही पतसंस्थांनी बँकेत ठेवलेल्या व परत काढून घेतलेल्या गुंतवणूकीच्या रक्कमेच्या ठेव पावत्यांवर बोगस तारण कर्जप्रकरणे दाखवून ४४ लाख ३८ हजार ४०१ रुपये निधीचा अपहार केला असल्याचे उघड झाले आहे. संबंधितांनी संगनमताने बँकेच्या सभासदांची व ठेवीदारांची ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३४४ रुपये फसवणूक केली असल्याचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक सावंत यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

  काेणावर दाखल झाला गुन्हा

  पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष अजित खामकर, उपाध्यक्ष जगन्नाथ सावंत, संस्थापक संचालक नंदकुमार खामकर, संचालक वजीर शेख, मनोज खटावकर, प्रकाश ओतारी, विलास खामकर, चंद्रकांत शिंदे, विष्णुपंत खरे, अर्जुन खामकर, जनार्दन वैराट, किरण कदम, जयश्री चौधरी, जयमाला खामकर, तज्ञ संचालक गोविंद लंगडे, अरुण केळकर, अँड. संतोष चोरगे, व्यवस्थापक रमेश जाधव, शाखाप्रमुख विनोद शिंदे (वाई), रणजीत शिर्के (खंडाळा), सुनिल वंजारी (वडूथ), वसंत जाधव (भुईंज), रोखापाल सुचित जाधव, महेश शिंदे, दिपक शिर्के, तानाजी भोसले याशिवाय बँकेचे तीन सनदी लेखापाल राहुल धोंगडे, डी. बी. खरात, एन. एस. कदम यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे करीत आहेत.  गु्न्हा दाखल झालेल्यापैकी बँकेचे चेअरमन अजित खामकर, संचालक वजीर शेख, विलास खामकर, जनार्दन वैराट, गोविंद लंगडे, अरूण केळकर हे सहाजण मयत असून अन्य सर्व संशयित फरारी आहेत.