शाळा सुरू पण एसटी बंद; विद्यार्थी म्हणतात, ‘आम्ही शाळेत जायचं कसं?’

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यभरातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या बंदच असल्याने परगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

    गोंदवले : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यभरातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या बंदच असल्याने परगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शालेय वेळात एसटी फेऱ्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थी-पालकांतून होत आहे.

    माण तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शाळा कॉलेजसाठी नजीकच्या मोठ्या गावात शिक्षणासाठी जात आहेत. माणच्या खेड्यापाड्यातून दहिवडी, म्हसवड, नातेपुते यासारख्या मोठया शहरामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेल्या एसटीच्या ग्रामीण फेऱ्या महामंडळाने अद्यापही सुरू केल्या नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शाळा व एसटी प्रशासनाने याबाबत योग्य नियोजन करून विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आवश्यक मार्गावर शालेय फेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.

    अनेक मार्गावरील एसटी फेऱ्या अनियमितपणे धावत असल्यामुळे विद्यार्थ्यांना एसटीसाठी ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे ‘शाळा सुरू, एसटी बंद’, अशी अवस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची झाली असून दहिवडी आगाराने शालेय वेळेत ग्रामीण एसटीफेऱ्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांतून होत आहे.

    मंदिरेही सुरू झाल्याने प्रवासात वाढ

    शासनाच्या निर्णयानुसार ४ ऑक्टोबरपासून ज्ञानमंदिरे सुरू झाली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७ ऑक्टोबरपासून राज्यभरातील मंदिरे सुरू होत आहेत. माण-खटाव तालुक्यात शिखर शिंगणापूर, म्हसवड, गोंदवले, मलवडी, औंध, पुसेगाव यासारखी मोठी देवालये गुरुवारपासून दर्शनासाठी खुली होत आहेत. त्यामुळे अनेकजण धािर्मक कारणांनी मंदिरे, तीर्थक्षेत्रांना भ्ोटी देतात, त्यामुळे विद्यार्थ्यांसह भाविक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या पूर्वीप्रमाणे नियमितपणे सुरू करण्याची मागणी होत आहे.