प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे शाळा बंद आहेत. काही शाळांकडे कित्येक दिवस शिक्षक आणि विद्यार्थीही फिरकले नाहीत. आता ज्या गावात कोरोनाचे रुग्ण नाहीत, अशा गावातील शाळा व कॉलेज सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाकडून त्या गावातील शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव मागवण्यात आला आहे. उद्या ही माहिती गोळा करण्याची अंतिम मुदत आहे. शासनाकडे ही माहिती पाठवल्यानंतर शासनाकडून कोणत्या शाळा सुरु करायच्या आणि कोणत्या नाही यावर निर्णय देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सांगितले.

    राज्यामध्ये कोरोनाची एन्ट्री होताच मुलांच्या सुरक्षितेसाठी सर्वच शाळा, कॉलेज्सना टाळे लागले. आता दुसरी लाटही ओसरु लागली आहे. गतवर्षीप्रमाणे हेही शैक्षणिक वर्ष ऑनलाईनच सुरु आहे. अद्याप शाळा सुरु नाहीत. मात्र, ज्या गावामध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्या गावात शाळा सुरु करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती व पालक यांच्यामध्ये बैठकीतून जो निर्णय होईल. त्यानुसार शिक्षण विभागास कळवल्यानंतर शिक्षण विभाग तो अहवाल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. शाळा बंद असल्या तरीही ऑनलाईन क्लासेस व ऑनलाईन शाळा सुरु असते. परंतु त्याचे शिक्षण एवढे प्रभावी ठरत नाही.

    सातारा जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या 2692 शाळा आहेत. तर खाजगी 741 शाळा आहेत. या सर्व शाळांना शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची मते यानुसार शाळा सुरु करायची की नाही असा अहवाल 13 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मागवण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी शाळांनी आपले मत शिक्षण विभागाकडे पाठविले आहे. काही शाळा उरलेल्या आहेत. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत तो अहवाल पूर्ण होऊन 2692 शाळांमधील नेमक्या किती शाळा सुरु करायच्या याचा अहवाल शासनाला पाठविण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.