अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून ऊसाचा दुसरा हप्ता बँकेत जमा

  सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा २०२०-२१ चा गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न झाला. या हंगामात कारखान्याने ७,३१,६६९ मे. टन ऊसाचे गाळप करून ८,७२,६६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, सरासरी साखर उतारा १२.८२% इतका प्राप्त झाला. या गाळप हंगामाची वैशिष्ट्ये म्हणजे या हंगामात निघालेला सरासरी साखर उतारा हा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर उतारा आहे.

  तसेच या हंगामात झालेले एकूण ऊस गाळप ७,३१,६६९ मे. टन हे अजिंक्यतारा कारखान्याचे इतिहासातील सर्वाधिक व उच्चांकी गाळप आहे. शेतकऱ्यांच्या गाळपास येणाऱ्या ऊसाला दर १० दिवसांप्रमाणे ऊसाचे बिल अदा करणारा अजिंक्यतारा कारखाना हा महाराष्ट्रात पहिला कारखाना आहे. या हंगामाकरिता केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या एफआरपी सूत्रानुसार आपले कारखान्याची एफआरपी. प्रति मे.टन रूपये ३०४३ इतकी निघालेली असून, चालू हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला
  पहिला अॅडव्हान्स हप्ता प्रति मे. टन रूपये २६०० प्रमाणे ऊसाचे पेमेंट वेळेतच अदा करण्यात
  आले आहे.

  हंगामात असे एकूण रूपये १९० कोटी २३ लाख ४२ हजार इतके पेमेंट अदा करण्यात आले आहे.
  यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सध्या पावसाळा सुरू झाला असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण विचारात घेता शेती मशागत, बि-बियाणे, रासायनिक खत खरेदीसाठीची रक्कम शेतकऱ्यांच्या वेळीच उपयोगी पडावी, यासाठी एफआरपीतील उर्वरित देय रक्कम प्रति मे. टन रूपये ४४३ पैकी प्रति मे. टन रूपये २०० प्रमाणे दुसरा अॅडव्हान्स हप्ता शेतकऱ्यांचे बँक खाती वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  या हंगामात झालेले एकूण गाळप ७,३१,६६९ मे. टन विचारात घेऊन दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति मे. टन रूपये २०० (विनाकपात) प्रमाणे होणारी एकूण रक्कम रूपये १४ कोटी ६३ लक्ष ३३ हजार ९५२ इतकी रक्कम आज तारखेस संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली असल्याचे सांगितले. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा.चेअरमन विश्वास शेडगे, संचालक रामचंद्र जगदाळे, राजाराम जाधव, यशवंतराव साळुखे, इंद्रजित नलवडे व कार्यकारी संचालक संजीव देसाई हे उपस्थित होते.