दि वाई अर्बन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची निवड : चंद्रकांत काळे

    वाई : बँकिंग क्षेत्रांत पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या दि वाई अर्बन को. आँप. बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची बिनविरोध निवड पार पडली. बँकेच्या बोर्ड आँफ मॅनेजमेंटमध्ये सहा सदस्यांची निवड केली आहे. बँकेचे विद्यमान तीन संचालक व बँकिंग विषयांतील तज्ञ तीन नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी हे पदसिध्द सदस्य असणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सी.ए. चंद्रकांत काळे यांनी दिली.

    चंद्रकांत काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकांस अनुसरून बँकेच्या बोर्ड आँफ मॅनेजमेंटची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे म्हणाले, नवीन बोर्ड आँफ मॅनेजमेंटमध्ये ६ सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र खिअलकुमार चावलानी यांची बोर्ड आँफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष म्हणून निवड करणेत आली आहे. सदस्यांमध्ये संचालक ऍड. प्रतापराव कृष्णराव शिंदे, तज्ञ संचालक चार्टर्ड अकौंटंट किशोरकुमार नामदेवराव मांढरे, रिझर्व्ह बँकेतील निवृत्त अधिकारी अविनाश शंकर जोशी, सेवानिवृत्त बँक अधिकारी मिलिंद पुरोहित,  नरेंद्र गांधी यांची निवड करण्यात आली आहे, असेही चंद्रकांत काळे यांनी सांगितले.

    चंद्रकांत काळे म्हणाले, बोर्ड आँफ मॅनेजमेंटमधील नवीन सदस्य हे बँकिंग विषयातील तज्ञ आहेत. राजेंद्र चावलानी हे गेली १५ वर्षे बँकेचे संचालक तर ८ वर्षे बँकेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांना बँकिंग, सहकार व बांधकाम व्यवसायाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. ऍड. प्रतापराव शिंदे हे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांचा कायद्याचा प्रदिर्घ अभ्यास आहे. सीए. किशोरकुमार मांढरे हे वाई व पुणे शहरांत नामवंत चार्टर्ड अकौंटंट म्हणून कार्यरत आहेत. हे तिघेही विद्यमान संचालक बोर्ड आँफ मॅनेजमेंटमधील सदस्य आहेत.

    नवीन निवडलेले सदस्य अविनाश शंकर जोशी हे रिझर्व्ह बँकेतील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांना रिझर्व्ह बँकेतील व सहकारी बँकिंगचा प्रदिर्घ अनुभव आहे. मिलिंद पुरोहित हे वाई अर्बन बँकेतून उपसरव्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. नरेंद्र गांधी हे जुनी सांगली बँक, नवीन आयसीआयसीआय बँकेतून निवृत्त झालेले आहेत. तिघेही सध्या सहकार भारतीच्या माध्यमांतून सहकारी संस्थांसाठी कार्यरत आहेत. तिघांनाही बँकिंगचा सखोल अभ्यास असल्याने त्यांची बँकेच्या बोर्ड आँफ मॅनेजमेंटमध्ये निवड करण्यात आली आहे. त्यांच्या ज्ञानाचा लाभ बँकेच्या प्रगतीसाठी निश्चितच होणार आहे, असा विश्वास चंद्रकांत काळे यांनी व्यक्त केला. नवीन सदस्यांनी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.

    त्यांच्या निवडीबद्दल बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांनी राजेंद्र चावलानी यांचे व नवीन सदस्यांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ संचालक डॉ. विनय जोगळेकर, मदनलाल ओसवाल, विवेक भोसले, ऍड. सीए. राजगोपाल द्रविड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, अंजली शिवदे, गीता कोठावळे, अनिल देव, वाई अर्बन परिवाराचे मार्गदर्शक अरूण देव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी व मान्यवरांनी नवीन बोर्ड आँफ मॅनेजमेंट सदस्यांचे अभिनंदन केले.